‘केडीसीसी’ अध्यक्ष निवड २५ मे रोजी

By Admin | Updated: May 10, 2015 01:02 IST2015-05-10T01:02:31+5:302015-05-10T01:02:31+5:30

मुश्रीफ, के.पी., पी.एन. यांच्या नावाची चर्चा

KDCC presidential election on 25th May | ‘केडीसीसी’ अध्यक्ष निवड २५ मे रोजी

‘केडीसीसी’ अध्यक्ष निवड २५ मे रोजी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची (केडीसीसी) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड २५ मे रोजी होण्याची शक्यता आहे. विभागीय सहनिबंधकांनी अधिसूचना काढल्यानंतर चौदा दिवसांच्या आत निवड घ्यायची असते. साधारणत: याबाबतची अधिसूचना मंगळवारी निघण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅँकेची निवडणूक ५ मे रोजी झाली. यामध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, जनसुराज्य पक्षाच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे. बॅँकेच्या २१ पैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्याच्यासह राष्ट्रवादीला ७ व काँग्रेसला ६, विनय कोरे यांना २, अपक्षांना तीन, तर मंडलिक गटास १ जागा मिळाली. शिवसेना-भाजपने सहा उमेदवार उभे केले होते. त्यांना एकाच जागेवर यश मिळाले. गगनबावडा संस्था गटातील निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड २५ मे रोजी होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा झाली नसल्याचे नेते सांगत असले, तरी पहिल्यांदा कोणाला संधी द्यायची याबाबत दोन्ही काँग्रेसच्या अंतर्गत गोटात चर्चा सुरू आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले, तर आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडे आले, तर पी. एन. पाटील यांचे नाव निश्चित होणार आहे. बॅँकेची निवडणूक झाली तरी बॅँक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. अजूनही बॅँकेला शंभर कोटींचा संचित तोटा आहे. त्यामुळे नव्या कारभाऱ्यांना जपूनच कारभार करावा लागणार आहे, अशा परिस्थितीत कर्ज वाटप अथवा वसुलीबाबतचा एखादा निर्णयही बॅँकेला पुन्हा अडचणीत आणू शकतो, अशा परिस्थितीत तेवढ्याच सक्षमपणे निर्णय घेण्याची कुवत आमदार मुश्रीफ व पी. एन. पाटील यांच्याकडेच आहे. निवडणुकीत बॅँकेच्या हितासाठी यांनी जागांसाठी फारसा आग्रह न धरता आमदार मुश्रीफ यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे पक्षीय बलाबल न पाहता पहिल्यांदा पी. एन. पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देऊन मुश्रीफ आगामी बाजार समिती निवडणुकीतील दोन्ही कॉँग्रेसची आघाडी घट्ट करून शिवसेना-भाजपला शह देऊ शकतात.

Web Title: KDCC presidential election on 25th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.