‘केडीसीसी’ दोन्ही काँग्रेसकडेच
By Admin | Updated: May 8, 2015 01:00 IST2015-05-08T00:59:34+5:302015-05-08T01:00:46+5:30
१३ जागांवर विजय : बँकेची सूत्रे पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार ?; शिवसेना-भाजपला केवळ एकच जागा

‘केडीसीसी’ दोन्ही काँग्रेसकडेच
कोल्हापूर : ‘जिल्ह्यााची आर्थिक नाडी’ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारली. त्यामुळे पाच वर्षांनंतर बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा या दोन पक्षांच्या ताब्यात आल्या आहेत. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी चार जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या.
राष्ट्रवादीला सात, काँग्रेसला सहा, विनय कोरे यांना दोन, अपक्षांना तीन, तर मंडलिक गटास एक जागा मिळाली. शिवसेना-भाजपने सहा उमेदवार उभे केले होते. त्यांना एका जागेवरच यश मिळाले. गगनबावडा संस्था गटातील निकाल राखीव ठेवला आहे. पूर्वी एकतर्फी सत्ता असलेल्या बँकेत ‘राष्ट्रवादी’च्या बरोबरीने काँग्रेसही मजबूत झाल्याचे चित्र निकालातून दिसले.
शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, माजी उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड व प्रा. जयंत पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. माजी आमदार पी. एन. पाटील, विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक व राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.
गुरुवारी दुपारपर्यंत येथील रमणमळा परिसरातील शासकीय गोदामात ३६ टेबलांवर मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी अधिकृत निकाल जाहीर केला. या बँकेसाठी मंगळवारी (दि. ५) चुरशीने ७०६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
जिल्हा बँकेत २००६ ते २०११ या पंचवार्षिकसाठी २००६ मध्ये दोन्ही काँग्रेसमध्येच झुंज झाली व त्यामध्ये राष्ट्रवादीचे पॅनेल बहुमताने सत्तेत आले. बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे १५, काँग्रेसचे ८, ‘जनसुराज्य’चे ४ आणि जनता दलाचा एक (ऊर्मिला श्रीपतराव शिंदे) असे बलाबल होते. परंतु, बँकेचा एनपीए ४१ टक्के झाला, नियमबाह्य कर्जपुरवठा, कर्जवसुलीसाठी प्रयत्न नाहीत, शाखांच्या तपासणीतील गंभीर दोष, रिझर्व्ह बँक व ‘नाबार्ड’चे निकष डावलून केलेला कर्जपुरवठा यांची दखल घेऊन तत्कालीन सहकार आयुक्तांनी १३ नोव्हेंबर २००९ ला संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. गेली सहा वर्षे बँकेत प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रशासक म्हणून चांगला कारभार करून बँक रुळावर आणली. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने बँकेची निवडणूक घेतली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने बँक अडचणीत आणली अशी टीका केली, त्याच पक्षाकडे पुन्हा बँकेची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
१२ संचालकांवर टांगती तलवार
बँकेत संचालक म्हणून निवडून आलेल्या तब्बल १२ संचालकांवर सहकार विभागाने यापूर्वीच नुकसानीची जबाबदारी निश्चित केली आहे. ही नुकसानभरपाईची वसुली न झाल्यास या संचालकांवर पुन्हा अपात्रतेची कारवाई होऊ शकते. राज्य शासन त्याबाबत कितपत आग्रही राहते यावर या गोष्टी अवलंबून असतील. उच्च न्यायालयाने या संचालकांवरील राज्य शासनाच्या कारवाईस स्थगिती दिल्याने त्यांना ही निवडणूक लढविता आली.
वाटून खाऊ...
‘आम्ही दोघे भाऊ-भाऊ... मिळेल ते वाटून खाऊ’, अशीच जिल्ह्याच्या राजकारणातील दोन्ही काँग्रेसची स्थिती आहे. गोकुळ दूध संघात राष्ट्रवादीने काँग्रेसला ‘बाय’ दिला व जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सोय होईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे या दोन्ही संस्थांवरील दोन्ही पक्षांचे किंबहुना ठरावीक नेत्यांचे वर्चस्व कायम राहिले. शिवसेना-भाजपने लढतीचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना फारसे यश मिळाले नाही.
प्रमुख पराभूत : शिवसेनेचे आमदार
डॉ. सुजित मिणचेकर, माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, बँकेचे माजी उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड व कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातील कारभारी नगरसेवक
प्रा. जयंत पाटील
प्रमुख विजयी : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार नरसिंगराव पाटील, शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजू आवळे.