शिरढोणमध्ये काविळीने मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: January 1, 2015 00:34 IST2015-01-01T00:34:00+5:302015-01-01T00:34:48+5:30
दूषित पाण्याचा बळी : कृष्णा-पंचगंगा दूषित पाण्याबद्दल नागरिकांतून संताप

शिरढोणमध्ये काविळीने मुलाचा मृत्यू
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे काविळीच्या साथीने पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या वैभव प्रकाश पाटील (वय ८) या मुलाचा मृत्यू झाला. कृष्णा-पंचगंगेच्या दूषित पाण्याचा तालुक्यातील पहिला बळी ठरला. मात्र, आरोग्य यंत्रणा अद्यापही सुस्तच असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पंचगंगेच्या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसतो. कोल्हापूरपासून इंचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेचे पाणी काळेकुट्ट झाले असून, त्याला उग्र वास येत आहे. पंचगंगेचे पाणी दूषित झाल्याने इचलकरंजी नगरपालिकेने बस्तवाड येथून कृष्णा नदीतून पिण्यासाठी पाणी योजना केली आहे. मात्र, पंचगंगेच्या दूषित पाणी प्रवाह कृष्णा नदीत मिसळून योजनेच्या बाजूनेच प्रवाहित होऊन कृष्णेचे पाणीही दूषित झाले आहे. शिरढोण गावाला पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, बहुतेक ग्रामस्थ पिण्यासाठी इचलकरंजी कृष्णा नळ योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधून पडणाऱ्या पाण्याचाच उपयोग करतात.
पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीचा पश्चिम बाजूचा प्रवाहही दूषित झाला आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. येथील माळभागात राहणाऱ्या वैभवला पंधरा दिवसांपूर्वी काविळीची लागण झाली होती. त्यामुळे दहा दिवसांपासून इंचलकरजी येथील बालरोग तज्ज्ञ रमेश स्वामी यांच्या दवाखान्यात उपचार चालू होते. मात्र, कावीळ वाढतच राहिल्याने नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात सोमवारी दाखल के ले होते. कावीळ मेंदूत चढल्याने आज, बुधवारी सकाळी उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. काविळीच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तच राहिल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)