काश्मिरी मुलींना आता स्वयंरोजगार प्रशिक्षण
By Admin | Updated: February 20, 2015 23:12 IST2015-02-20T21:57:16+5:302015-02-20T23:12:08+5:30
आदिक कदम : बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचा उपक्रम

काश्मिरी मुलींना आता स्वयंरोजगार प्रशिक्षण
कोल्हापूर : काश्मीरमधील निराधार मुलींना शालेय शिक्षणाबरोबरच आता स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या मार्च महिन्यापासून होणार असल्याचे बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचे संस्थापक आदिक कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कदम म्हणाले, बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनने जम्मू आणि काश्मीरमध्ये निराधार मुलींच्या शिक्षणासाठी चार घरे सुरू केली आहेत. या घरांतून १७० मुली शिक्षण घेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असणाऱ्या काश्मिरी मुलींना शिक्षण देऊन त्यांना नोकऱ्या मिळतील; परंतु बेरोजगारी मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी संस्थेच्याच मुलींना गेल्या चार महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात मुलींसोबत काश्मिरी महिलांनाही संधी देण्यात येणार आहे. संस्थेतील एक शिक्षक शेख जहूर म्हणाले की, अनंत अडचणी असल्या तरी संस्थेचे काम चांगले चालले आहे. स्थानिक सरकारलाही जेथे निवासी शाळा काढणे शक्य झाले नाही, ते या संस्थेने करून दाखविले. मुलींच्या शिक्षणाकडे सरकारचे लक्ष नव्हते अशा कालखंडात निवासी शाळा सुरू करून अनाथ, गरीब कुटुंबातील मुलींना जगण्याची एक नवी संधी संस्थेने दिली आहे. काश्मीरमधील बडगांम जिल्ह्यातील बिरवा येथील संस्थेच्या घरातील २५ मुली महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असून, चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात आल्या आहेत. त्यांनी येथील न्यू पॅलेस, पन्हाळा, गंधर्व रिसॉर्ट, कणेरी मठ पाहिला. सागर बगाडे व कोल्हापूर केअर संस्थेने या मुलींना भेटवस्तू दिल्या. मुस्लिम बोर्डिंगमध्ये या मुलींचा कोल्हापुरातील मुलींशी संवाद घडवून आणण्यात आला. सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली. गोव्यात जाऊन या मुलींनी आयुष्यात प्रथमच समुद्राचे दर्शन घेतले. क्रुझवरून फिरण्याचा आनंद लुटला. यावेळी गणी आजरेकर, मिलिंद धोंड,जयेश कदम, आसीफ जमादार आदी उपस्थित होते.