समीर देशपांडेकोल्हापूर : पहलगाम येथे मोठा आतंकवादी हल्ला झाल्यानंतर आता काश्मीरला जाणाऱ्यांनी आपला बेत रद्द केला आहे. ‘लाखो रुपये भरून आणि जिवाला घोर कुठं लावून घ्यायचा’, असे म्हणत अनेकांनी आपला काश्मीर दौरा रद्द करण्याची विनंती सहल संयोजकांना केली आहे. वर्षातून एकदाच मोठ्या सहलीला जाणे होत असल्याने अनेकांनी पर्यायी पर्यटनस्थळांची चाचपणी सुरू केली आहे.काल दुपारी हा हल्ला झाल्यानंतर साहजिकच कोल्हापूर आणि परिसरातील जे पर्यटक काश्मीरला गेले आहेत. त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंता पसरली. अनेकांचे मोबाइल लागत नसल्याने या काळजीत परत भर पडली, परंतु रात्री उशिरा महाराष्ट्रातील मृत्यू पावलेल्यांची नावे जाहीर झाली आणि कोल्हापूर आणि परिसरातील कोणी नसल्याचे स्पष्ट झाल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.दरम्यान या घटनेनंतर सहल संयोजक कंपन्यांमध्येही अस्वस्थता पसरली, कारण एकीकडे गेल्या दोन महिन्यांपासून नियोजन करून सहली आयोजित केल्या असताना, त्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर आणि परिसरातील सुमारे २०० हून अधिक पर्यटक सध्या काश्मीरमध्ये असून, त्यातील काही जण परत येण्यासही निघाले आहेत.येथील गगन टुरिझमतर्फे गेलेले १६ पर्यटक घटना घडण्याआधीच पहलगामवरून बाहेर पडले होते. ते सुखरूप श्रीनगरला हॉटेलवर पोहोचले. ते परतीच्या मार्गावर आहेत. सहल संयोजक आदित्य मिरजे म्हणाले, रूकडी परिसरातील तीन डॉक्टर दाम्पत्ये पहलगामला गेली होती. परंतु, ती सुखरूप असून, उद्या परत येत आहेत.
श्रीनगरमध्ये दिवसभर हॉटेलमध्येचवसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. एल. हरेर, आजऱ्यातील व्यापारी गजानन केळकर, प्रकाश टोपले हे सपत्नीक काश्मीरला गेले होते. त्यांच्यासोबत पुण्याची पाच दाम्पत्ये आहेत. परंतु काल दुपारनंतर श्रीनगरमध्ये आल्यानंतर पहलगाम येथे हा हल्ला झाला. बुधवारी श्रीनगरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, हे सर्वजण हॉटेलवरच थांबले. उद्या ही सर्व मंडळी परतणार आहेत.
भीती बाजूला सारून पर्यटनएकीकडे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे अनेक पर्यटकांनी श्रीनगरजवळील दाल लेक येथे जलपर्यटनाचा आनंद घेतला, तर निशांत उद्यानालाही भेट दिली. सहल संयोजक रवी सरदार म्हणाले की, कोल्हापूर आणि परिसरातील पर्यटकांनी इतक्या लांब आल्यानंतर हॉटेलवर थांबणे पसंत न करता आज जलविहाराचा आनंद घेतला.
लाखोंची उलाढाल ठप्पकोल्हापूरहून काश्मीरला जाण्यासाठी सरासरी प्रतिव्यक्ती ७० हजार रुपये खर्च येतो. गतवर्षी ५०० हून अधिक पर्यटक मे महिन्यात काश्मीरला गेले होते. दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांनी आपली आरक्षणे रद्द केली आहेत. काहींनी सहल संयोजक यांच्याकडे पैसे परत मागितले असून, काहींनी पर्यायी पर्यटनस्थळांची पसंती दर्शवली आहे. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
येत्या रविवारी आणि पुढच्या रविवारी प्रत्येकी ४० असे एकूण कोल्हापूर आणि परिसरातील ८० पर्यटक काश्मीरला जाणार होते. या सहली रद्द करण्यात आल्या असून, १५ मेपर्यंत काश्मीर सहलीसाठी आरक्षणही बंद केले आहे. - रवींद्र पोतदार, गिरीकंद हॉलिडेज
सहल संयोजकांची परीक्षा बघणारा असा हा प्रसंग आहे. इतके दिवस मेहनत करून सहलींचे संयोजन केलेले असते. परंतु, या दुर्घटनेमुळे आमच्या अनेक सदस्यांना या सहली रद्द कराव्या लागत आहेत. - बळीराम वराडे, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर