कासेगावच्या डॉक्टरला अटक
By Admin | Updated: June 30, 2015 00:22 IST2015-06-29T00:48:17+5:302015-06-30T00:22:10+5:30
गर्भलिंग निदान प्रकरण : सोनोग्राफी यंत्र पुरविल्याचा आरोप

कासेगावच्या डॉक्टरला अटक
कोल्हापूर : गर्भलिंग चाचणीचे सोनोग्राफी यंत्र पुरविणाऱ्या कासेगावच्या डॉक्टरला रविवारी जुना राजवाडा पोलिसांनी त्याच्या घरी अटक केली. विक्रम विलास आडके (वय ३५) असे त्याचे नाव आहे. त्याने यंत्र कोठून आणले यासह आतापर्यंत कोणाकोणाला यंत्राची विक्री केली, याची त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.
आलिशान कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोबाईल सोनोग्राफी यंत्र कासेगावचा डॉक्टर आडके याच्याकडून घेतल्याची कबुली संशयित डॉ. हिंदुराव पोवार याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या घरी व रुग्णालयावर शुक्रवारी मध्यरात्री छापे टाकले असता, तो पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर असताना रविवारी सकाळी तो त्याच्या घरी सापडला. दुपारी पोलीस त्याच्याकडे गुन्हे शाखेच्या बंद खोलीमध्ये कसून चौकशी करीत होते. त्याने बी. एच. एम. एस. पदवी घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्याने चायना बनावटीचे यंत्र कोठून आणले, आणखी कोणाकोणाला अशी यंत्रे पुरविली आहेत, याची माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत. त्याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. संशयित पोवार व नाईक या डॉक्टरांच्या मोबाईलचे सीडीआर मागविले आहेत. ते आज, सोमवारी मिळणार आहेत. त्यावरून त्यांचे कोणाकोणाशी संपर्क झाले आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. गर्भलिंग चाचणी यंत्राची हार्ड डिस्क मुंबईतील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे. त्या रिपोर्टवरून आतापर्यंत किती गर्भलिंग चाचण्या केल्या आहेत, त्यांचे किती लोकांशी लागेबांधे आहेत, हेदेखील स्पष्ट होणार आहे.
पोवार बोगस डॉक्टर
संशयित पोवार याने पदवी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यावरून तो बोगस डॉक्टर असल्याचा संशय बळावला होता. रविवारी त्याने स्वत:हून आपण डॉक्टर नसल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांना सांगितले.