कसबा तारळेत ५० हजारांचा ढपला
By Admin | Updated: December 29, 2014 00:10 IST2014-12-28T23:44:13+5:302014-12-29T00:10:02+5:30
जिल्हा बँक शाखा : लिपिकाकडून खातेदाराच्या नावावरील रक्कम लंपास

कसबा तारळेत ५० हजारांचा ढपला
राजाराम लोंढे - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा तारळे शाखेत एका खातेदाराच्या नावावरील ५० हजार रुपये परस्पर लंपास करण्याचा प्रताप ‘देवाच्या नावा’ने असणाऱ्या या बॅँकेच्या एका लिपिकाने केला आहे. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा असून, तालुक्यातील एका वजनदार नेत्याच्या दबावापोटी ही चर्चा बँकेच्या प्रशासकांपर्यंत पोहोचलेली नाही.
‘शेतकऱ्यांची अर्थवाहिनी’ म्हणून जिल्हा बॅँकेकडे पाहिले जाते. संचालक मंडळाच्या प्रतापामुळे बॅँकेवर प्रशासक आले तरी शेतकऱ्यांची बॅँकेबद्दलची आस्था थोडीही कमी झालेली दिसत नाही. त्यामुळेच प्रशासकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बॅँकेचे भागभांडवल वाढीसाठी मदत केली. इतका विश्वास शेतकऱ्यांचा बँकेवर आहे; पण या विश्वासाला तडा देण्याचे काम बँकेचे काही कर्मचारी करत आहेत. आठ दिवसांपूर्वी बॅँकेच्या कसबा तारळे शाखेत धक्कादायक प्रकार घडला. शाखेतील एका खातेदाराने विश्वासू व्यक्ती म्हणून लिपिकाकडे ४० हजार रकमेचा चेक वठवण्यास दिला होता. लिपिकाने हे पैसे संबंधिताला दिले; पण हे पैसे काढताना खात्यात मोठी रक्कम असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर लिपिकाने दुसऱ्या दिवशी स्लीपने ५० हजार रुपये काढले. पासबुक भरल्यानंतर संबंधित खातेदाराला घडला प्रकार लक्षात आला. नेमके काय झाले याची माहिती दोन दिवसांत दिली जाईल, असे सांगत शाखाधिकाऱ्यांनी खातेदाराची समजूत काढली. त्याच दिवशी सायंकाळी शाखाधिकाऱ्यांनी झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आपल्यावर कारवाई होणार म्हटल्यावर संबंधित लिपिकाने राधानगरी तालुक्यातील वजनदार नेत्याशी बोलून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संबंधित खातेदाराने बॅँकेच्या निरीक्षकांपर्यंत तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी करून हे प्रकरण बॅँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत गेले; पण तिथेच हे प्रकरण थांबले.
राज्यातील जिल्हा बँकांमध्ये ‘सर्वाधिक पगार’ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. बॅँकेचा शिपाई ३० हजार रुपये पगार घेतो. ५० हजारांचा ढपला पाडणाऱ्या लिपिकाला ३८ हजार रुपये पगार आहे. गलेलठ्ठ पगार असतानाही ऐशोरामासाठी माती खाण्याचा प्रकार बॅँकेत होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बारा वर्षे याच शाखेत तळ
प्रशासकांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे काहींच्या बदल्याही झाल्या; पण हा लिपिक एकाच शाखेत तब्बल १२ वर्षे तळ ठोकून असल्याने त्याला सर्व खातेदारांच्या सह्या अवगत आहेत.