कसबा बावडा जलउपसा केंद्र बंदच
By Admin | Updated: December 16, 2014 00:18 IST2014-12-15T20:53:17+5:302014-12-16T00:18:35+5:30
लाखोंची मशिनरी ‘स्क्रॅप’ : तीन वर्षांपासून टाळे असल्याने केंद्राच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य

कसबा बावडा जलउपसा केंद्र बंदच
रमेश पाटील - कसबा बावडा -राजाराम बंधाऱ्याजवळील बावडा जल उपसा केंद्र गेल्या अडीच वर्षांपासून बंद करण्यात आल्याने उपसा केंद्रातील लाखो रुपयांची मशिनरी आता स्क्रॅप झाली आहे. दरम्यान, हे उपसा केंद्र सध्या स्टँडबाय ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या उपसा केंद्रातून दूषित पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे हे केंद्र त्वरित बंद करावे व शिंगणापूर उपसा केंद्रातून उपसलेले पाणी फिल्टर करून ‘ई’ वॉर्डला पुरवावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बावडा जलउपसा केंद्र बंद करण्यात आले. या केंदा्रतील पाण्याच्या मोटारीचा वापर फक्त अन्य ठिकाणी होऊ शकला. अन्य माशिनरीचा वापर मात्र महापालिकेला अन्य ठिकाणी करता येऊ शकलेला नाही. कारण मशिनरी हे बांधकामाच्या डिझाईननुसार तयार करून बसविण्यात आल्या होत्या. पाणी उपसा केंद्राने अंतर, पाईप, पंप, मोटारे आदी उपसा केंद्राच्या क्षमतेनुसार बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या साहित्याचा अन्य ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या ही मशिनरी स्क्रॅप झाली आहे.
दरम्यान, उपसा केंद्र जरी बंद असले, तरी या केंद्राच्या आवारात बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रस्सामंडळ पार्टी होत आहेत. त्यामुळे उपसा केंद्राच्या समोरच मद्याच्या बाटल्या आणि कचरा वाढत चालला आहे.
या उपसा केंद्राची इमारत मात्र अद्यापही टोलेजंग अशी आहे. या इमारतीचा उपयोग असा काही कारणासाठीच होतो काय, हे महापालिकेने पाहणे गरजेचे आहे. उपसा केंद्राचा आवार खूप मोठा आहे. उपसा केंद्र सध्या स्टँडबाय अवस्थेत असले, तरी भविष्यात त्याचा वापर पूरनियंत्रण कक्ष किंवा एखाद्या गोडावूनसाठी होऊ शकतो. महापालिकेने त्यादृष्टीने त्याकडे पाहणे गरजेचे आहे.
मशिनरीचा वापर
होऊ शकत नाही
सध्या उपसा केंद्र बंद आहे. शक्य आहे त्या मशिनरींचा वापर अन्यत्र करण्यात आला आहे. मात्र, अन्य इतर मशिनरींचा दुसऱ्या ठिकाणी वापर होऊ शकत नाही. ही वस्तूस्थिती आहे.
- मनीष पवार, जल अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका