कसबा बावडा, लाईन बझार मस्जिदीची शंभरी पार
By Admin | Updated: July 9, 2015 00:30 IST2015-07-09T00:30:21+5:302015-07-09T00:30:21+5:30
करवीर तालुक्यात ६० प्रार्थनास्थळे : सर्वत्र धार्मिक कार्यक्रमाची लगबग--महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

कसबा बावडा, लाईन बझार मस्जिदीची शंभरी पार
रमेश पाटील- कसबा बावडा -पवित्र रमजान महिन्यात रोजे, नमाज, तरावीह पठण याद्वारे अल्लाहची मर्जी, आशीर्वाद मिळविण्यात प्रत्येक मुस्लिम बांधव मग्न असल्याचे चित्र कसबा बावड्यासह करवीर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील लहान-मोठ्या ६० मस्जिदींमधून नमाज पठण होते.
कोल्हापूर शहराचे उपनगर असलेल्या कसबा बावड्याच्या मध्यवर्ती भागात १०० वर्षांपूर्वीची शाही जामे मस्जिद आहे. समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून त्याची डागडुजी करण्यात आली आहे. कसबा बावड्याचे अमिरसाब म्हणून रुस्तम पठाण हा पदभार सांभाळत आहेत. मस्जिद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेरअली हवालदार, उपाध्यक्ष जावेद नदाफ, सदस्य जावेद खान, मुस्ताक मोमीन, नजीर शेख, राजेखान शेख, ताजुद्दीन मुल्ला, सिकंदर इनामदार, आब्बास नदाफ हे मस्जिदीचे कामकाज पाहत आहेत. शब्बीर सुलतान मोमीन हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.
लहान मुलांच्या धार्मिक शिक्षणासाठी मक्तब घेतला जातो. तो सायंकाळी ७ ते ८ या वेळेत असतो. पवित्र रमजान महिन्यात या मस्जिदीमध्ये नमाज, तरावीह पठण, दुवा होते. ईद दिवशी इदगाहवर नमाज पठण केली जाते. लाईन बझार येथेही सव्वाशे वर्षांची परंपरा असलेली लाईन बझार सुन्नत मुस्लिम जमियत मस्जिद आहे. येथेही रमजान महिन्यात रोजे, नमाज, तराविह पठण होत आहे. दादासाहेब सय्यद या मस्जिदीचे अध्यक्ष आहेत.
उचगाव येथे १९९५ च्या काळातील जुनी जामा मस्जिद आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात जामा मस्जिद येथे चार ते साडेपाचशे मुस्लिम बांधव नमाज, तरावीह पठण करतात. मणेरमळा, गडमुडशिंगी, उजळाईवाडी, याठिकाणी मस्जिदी आहेत. दिलावरभाई सय्यद, दस्तगीर मुजावर, बाबासो मुल्लाणी, उल्फत मुल्ला, मुबारक सनदी, मकबुल गुलाब मुल्लाणी, हाफीज शोएब साहब, जहांगीर मकानदार, बालेचाँद कुरणे हे जामा मस्जिदीचे ट्रस्टी आहे.
तालुक्यातील वडणगे, खुपिरे, केर्ले, वाकरे, कोपार्डे, आदींसह
इतर गावांतील लहान-मोठ्या मस्जिदींमधून तरावीह, नमाज पठण, आदी धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम बांधव व्यस्त दिसत आहेत.