पर्यटकांना खुणावतोय कास-बामणोलीचा पाऊस

By Admin | Updated: July 27, 2014 22:45 IST2014-07-27T22:45:14+5:302014-07-27T22:45:14+5:30

हिरवळ दाटली चोहिकडे : छोट्या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

Kas-Bamnoli rain is marking the tourists | पर्यटकांना खुणावतोय कास-बामणोलीचा पाऊस

पर्यटकांना खुणावतोय कास-बामणोलीचा पाऊस

बामणोली : पावसामुळे कास-बामणोली परिसराचे सृष्टिसौंदर्य बहरून आले आहे. येथील डोंगरकड्यांवरून कोसळणारे छोटे धबधबे, हिरव्या पाऊलवाटा अन् बामणोली जलाशय खुणावू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.सलग आलेल्या सुट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक कास-बामणोली परिसरात गर्दी करू लागले आहेत. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या गाड्या सांबरवाडी घाटातून कासकडे निघाल्या होत्या. गेले पंधरा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अधूनमधून रिमझिम सरींमध्ये भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते. हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला थांबून जेवणावर यथेच्छ ताव मारला. साबंरवाडी येथे पोलिसांनी चेकनाका सुरू केल्याने अनेक जोडप्यांची आज पंचाईत झाली. शनिवारी दिवसभरात पुणे, मुंबई येथील सुमारे ११० वाहनांमधून २५० पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
कास तलाव तसेच रस्त्यालगतच्या डोगरकडांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांत भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. कोयना धरण निम्म्याहून अधिक भरल्याने तसेच बामणोलीचा बोट क्लब तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाल्याने शनिवारी अनेक पर्यटकांनी नौकाविहाराचाही आनंद लुटला. अनेक तरुण धूमस्टाईलने बाईक चालवत असल्याने चेक नाक्यावरील पोलिसांना दुचाकीस्वारांना योग्य समज द्यावी. (वार्ताहर)
कास पठारावर प्रवेश शुल्क आकारणी सुरू
कास पुष्प पठारावर आज (शनिवार)पासून वन समित्यांमार्फत पर्यटकांना प्रवेशशुल्क आकारण्यास प्रारंभ झाला. कास पुष्प पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी बाकी असतानाही अनेक पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
ठोसेघर परिसरात पर्यटकांचा धांगडधिंगा
परळी : ठोसेघर धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. संततधार पावसामुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागल्याने पर्यटकांची याठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, बेदरकार वाहने चालविणे, छेडछाड करणे असे प्रकार काही अतिउत्साही पर्यटकांकडून होत असल्याने इतरांना मुक्त आनंद लुटता येत नाही. पावसामुळे ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचे विस्तृत पठार, रंगबेरंगी रानफुले, कधी रिमझिम पाऊस तर कधी दाट धुके असे स्वर्गीय वातावरण येथे असल्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी वाढत असते. मात्र, सर्वांना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता यावा, यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्यभरातून पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात येत असतात. त्यांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शुनिवारी सुटी असल्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून पर्यटकांनी हजेरी लावली होती.

Web Title: Kas-Bamnoli rain is marking the tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.