‘करवीर’ला विकासाचे मॉडेल करणारच--माझा अजेंडा...!

By Admin | Updated: November 14, 2014 23:33 IST2014-11-14T23:27:10+5:302014-11-14T23:33:08+5:30

शेतीस अखंडित वीजपुरवठा : ‘धामणी’ प्रकल्प पूर्ण करणार, गगनबावड्यात ‘एमआयडीसी’ उभारणार

'Karveer' will be the development model - my agenda ...! | ‘करवीर’ला विकासाचे मॉडेल करणारच--माझा अजेंडा...!

‘करवीर’ला विकासाचे मॉडेल करणारच--माझा अजेंडा...!

राजाराम लोंढे  कोल्हापूर -रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांबरोबर औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून करवीर मतदारसंघ राज्यात ‘मॉडेल’ बनवू, असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. आगामी पाच वर्षांत कोल्हापूर-गगनबावडा चौपदरीकरण, धामणी प्रकल्प पूर्ण करणे, शेतीपंपाला अखंडित वीजपुरवठा यांसह गगनबावड्यात ‘मिनी एमआयडीसी’ उभी करणे ही कामे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील पाच वर्षांत करवीरच्या जनतेला दिलेले अभिवचन पूर्ण करू शकलो, याबद्दल समाधान वाटत असले तरी आता जबाबदारी वाढली आहे. मतदारसंघात अजूनही काही गावांत मूलभूत प्रश्न आहेत, ते मार्गी लावणार आहे. बहुतांश गावांना जोडणारे रस्ते गेल्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा
प्रयत्न केला आहे. कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग तळकोकणाशी जोडला जात
असल्याने त्याचे चौपदरीकरण करणे व त्याचबरोबर कोल्हापूर-भोगावती
रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यासाठी मान्यता मिळाली असून, येत्या वर्षभरात ते पूर्णत्वास जाईल. काही वाड्या-वस्त्यांवर पाणीप्रश्न व रस्त्यांचे प्रश्न आहेत, ते मार्गी लावणार आहेच; पण रस्ते व पाणी योजना याशिवाय मतदारसंघाचा औद्योगिक विकास केला तरच तेथील जनजीवन उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत त्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील निगवे क्रीडासंकुल पूर्ण झालेले आहे. गगनबावडा, बाचणी या क्रीडासंकुलांसाठी अनुक्रमे ७५ व ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परिसरातील क्रीडापटूंसाठीही अद्ययावत क्रीडासंकुल होणे गरजेचे आहे. हसूर, कुरुकली, कोगे या परिसरात पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. या परिसरातील नागरिकांना होडी (नावे)चा आधार घ्यावा लागतो. या पुलासाठी ‘नाबार्ड’कडून निधी घेऊन हा प्रश्नही मार्गी लावणार आहे. शेतीपंपांच्या विजेचा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांना आठ तास वीज दिली जाते. तीही खंडित असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यांना मुबलक वीज, तीही दिवसाची मिळाली पाहिजे, यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. गुळाच्या अस्थिर दरामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत. साखर उद्योगासमोरही संकटांचा डोंगर आहे. गूळ व साखरेला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.
मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात संजीवनी ठरणारा धामणी प्रकल्प पूर्णत्वासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. प्रकल्प पूर्ण होण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून प्रकल्प मार्गी लावला जाईल. मतदारसंघातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. गगनबावडा तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर तेथील जीवनमान उंचावण्यासाठी येथे छोटे-छोटे उद्योग आले पाहिजेत. यासाठी येथे मिनी एमआयडीसी आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही आमदार नरके यांनी सांगितले.

होय ! यासाठी आग्रही
आधुनिक कृषी महाविद्यालय : अपारंपरिक शेती, पणन, उत्पादन, खते यांबद्दल नेमकी व आधुनिक माहिती देणारी महाविद्यालये.
धामणी प्रकल्प : प्रलंबित धामणी प्रकल्प मार्गी लावणार
बांबू लागवड : गगनबावडा तालुक्यात बांबू लागवडीस प्राधान्य देणार
२४ तास वीजपुरवठा : शेतीपंपासाठी २४ तास वीजपुरवठा
टोलचा प्रश्न : सामान्य माणसांना भुर्दंड असलेल्या टोलला हद्दपार करणारच
पर्यटन केंद्रे : पन्हाळा व गगनबावडा हा परिसर निसर्ग, डोंगर व जंगलांनी नटलेला आहे. येथील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी पर्यटन केंद्रे विकसित करणार
महिलांना रोजगार : महिलांना बचतगटांच्या माध्यमातून छोटे उद्योग निर्मिती करून देणार.


राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यावर ‘लोकमत’ने रेंगाळलेले प्रश्न ही मालिका प्रसिद्ध केली. या मालिकेतून प्रत्येक तालुक्यांतील समस्या तसेच अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ असलेले प्रश्न पुढे आणले. आता या समस्या तसेच रेंगाळलेल्या प्रश्नांवर नवनिर्वाचित आमदारांचा ‘माझा अजेंडा...!’ ही मालिका सुरू करीत आहोत. नूतन आमदारांचा आगामी पाच वर्षांतील विकासाचा नेमका अजेंडा काय असणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ करीत आहे. त्याची सुरुवात आज, शनिवारपासून करवीर विधानसभा मतदारसंघापासून करीत आहोत. आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी केलेली बातचित....

Web Title: 'Karveer' will be the development model - my agenda ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.