करवीर तहसील, पोलीस स्थानकाला पार्किंगला जागा कधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:01+5:302021-01-08T05:17:01+5:30
कोपार्डे : ११८ गावे आणि २२ वाड्या-वस्त्यांचा महसुली कारभार तसेच करवीर तालुक्याचे मुख्य पोलीस ठाणेही कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी ...

करवीर तहसील, पोलीस स्थानकाला पार्किंगला जागा कधी मिळणार
कोपार्डे : ११८ गावे आणि २२ वाड्या-वस्त्यांचा महसुली कारभार तसेच करवीर तालुक्याचे मुख्य पोलीस ठाणेही कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी आहे. मात्र, येथे वाहनांना पार्किंगची सोय नसल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या कार्यालयात पार्किंगची सुविधा निर्माण करण्याची मागणी होत आहे. या कार्यालयात पार्किंग नसल्याने नागरिकांना आपली वाहने सीपीआरच्या आवारात किंवा जुन्या न्यायालयाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूने पार्क करावी लागत आहेत. करवीर तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालये शहरात आहेत. भाऊसिंगजी रोड येथे तहसीलदार कार्यालय, करवीर पोलीस ठाणे, पुरवठा विभाग व अनुषंगिक कार्यालये आहेत. महसूल, रेशनकार्ड, पेन्शन यासह पोलीस ठाण्यातील कामाकाजासाठी करवीर तालुक्यातील जनतेला येथे ये-जा करावी लागते. लोकसंख्या वाढीबरोबर प्रशासकीय व महसुली कामात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. पण या कार्यालयातील सोयी-सुविधांकडे ना लोकप्रतिनिधींचे ना प्रशासनाचे लक्ष आहे. येथे शौचालयाचीही सोय नाही, यामुळे विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने नागरिकांना पाणी पिण्यासाठीही हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. करवीर तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाण्यापासून तालुक्यातील काही गावांचे अंतर ३० ते ३५ किलोमीटर आहे. कामासाठी यावे तर काही गावांमध्ये अद्याप एस. टी.ची सेवाही सुरु झालेली नाही. त्यामुळे कामासाठी तहसीलदार अथवा करवीर पोलीस ठाण्यात येण्यासाठी दुचाकी अथवा तत्सम वाहनानेच यावे लागते. मात्र, येथे आल्यानंतर वाहन पार्किंगची सोय नसल्याने एकतर रस्त्याच्या कडेने, सीपीआरच्या आवारात, न्यायालयाच्या जुन्या इमारतीसमोरील रस्त्यावर अथवा पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असणाऱ्या बोळात दुचाकीचे पार्किंग करावे लागते.
फोटो : ०७ करवीर तहसील कार्यालय
करवीर तहसीलदार कार्यालयासमोर रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग होते.