करवीरचा शाही दसरा
By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T22:17:22+5:302015-10-18T23:57:37+5:30
शमी पूजन

करवीरचा शाही दसरा
‘करवीरच्या नवरात्रौत्सव पर्वाचा कलशाध्याय म्हणजे दसरा! भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजे दसरा. नवरात्राच्या निमित्ताने अनुष्ठानाला बसलेले देव आणि त्यांच्या निमित्ताने व्रतस्थ असे त्यांचे भक्त नवमीला पारणं करतात. चातुर्मासाच्या निमित्ताने झाकून ठेवलेली शस्त्रास्त्रे महानवमीला घासून-पुसून लख्ख केली जातात आणि अखेरीला दिवस उजाडतो तो विजयादशमीचा. १९९० च्या दशकापर्यंत कोल्हापूरचा हा सीमोल्लंघनाचा सोहळा टेंबलाईच्या टेकडीच्या पायथ्याला रंगायचा. त्यानंतर मात्र हा सोहळा तत्कालीन ब्रिटिश प्रेसिडेन्सी आणि कोल्हापूर शहर यांच्या मध्यावर असलेल्या चाफाळ्याच्या माळावर होऊ लागला.
या माळावर अधिक्याने असलेल्या चाफ्याच्या झाडामुळे या भागाला हे नाव होतं. आज आपण यालाच दसरा चौक म्हणून ओळखतो. दसऱ्याच्या आधी संस्थानच्या जरासखान्याकडून मंडप घातला जाई. लकड कोट म्हणजे लाकडाचा तात्पुरता चौक बांधून त्यात आपट्याची रास रचली जाते.
पटांगणात भव्य भगवा ध्वज उभारला जातो. दसऱ्या दिवशी चारच्या दरम्यान लवाजमा निघतो. आजही लवाजमा निघतो; पण पूर्वी या लवाजम्याचा क्रम खालीलप्रमाणे असायचा.
१) सर्वांत आरंभी बैलगाडीत चौघडा, त्या पाठोपाठ २) हत्तीवर भगवी ढाल (ध्वज). ती धरण्याचा मान बिनी सरनाईक यांचा. मग ३) तोफखाना. ४) जरीपटक्याचा हत्ती : जरीपटका हा सैन्याचा ध्वज. तो धारण करण्याचा मान सेनापतींचा. त्यांच्या रक्षणार्थ घोडेस्वारांचे पथक. ५) रिसाला म्हणजे लढाऊ घोडदल. ६) दुसऱ्या हौद्याचा हत्ती कै. नानासाहेब यादव यांनी दिलेल्या संदर्भानुसार. या हौद्यात श्री तुळजाभवानीच्या सुवर्णपादुका असत. ७) कोतवाली घोडे. ८) शिकारखान बैलगाडीवर १०-२० चित्ते, शिकारी कुत्रे, वाघ, सिंह, बाजनहिरी म्हणजे डोळ्यावर झापड लावलेले बहिरीससाणे मनगटावर बसवून त्यांना पाळणारे. ९) संत्री, पायदळ. १०) बाजेवाले. ११) भावी भालदार (भाल्याचे युद्ध करणारे). १२) बाणदार (धनुष्यबाणांनी लढणारे). १३) विटेकरी. १४) पोलीसदल. १५) तुरुंगाकडील शिपाई. १६) जंगलखात्याकडील शिपाई. १७) नगरपालिकेकडील लोक. १८) आधुनिक पद्धतीचा बँड. १९) पट्टेवाले. २०) करवीर पेट्याकडील अधिकारी. २१) बंदूक बारदार. २२) कोटकरी. २३) लष्कर फड. २४) देवांच्या पालख्या. २५) हुजरे. २६) जासूद. २७) म्हालदार, चोपदार. २८) हुजूर स्वारी अंबारीमध्ये किंवा सहा घोड्यांच्या सोन्याच्या रथात, त्यापाठोपाठ पंत अमात्य, पंत प्रतिनिधी इ. २९) वाड्यातील स्वाऱ्या महालच्या (सरकार
स्वारींच्या कुटुंबातील महिला). ३०) शिलेदार
आणि अखेरीस ३१) साहेब नौबत म्हणजे उंटावरचा नगारा. आज हे वैभव नसले तरी कोल्हापूरवासीयांना संस्थानचा अभिमान तितकाच आहे आणि त्याच उत्साहात हा दसरा आजही तितक्याच थाटात संपन्न होतो.
- प्रसन्न मालेकर, कोल्हापूर
शमी पूजन
द्युत क्रीडेत ठरलेल्या पणाप्रमाणे पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास मिळाला होता. या अज्ञातवासात पांडवांची ओळख जर उघडकीस आली, तर त्यांना पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा लागणार होता. याकरिता विराट राजाच्या नगरीत त्यांनी प्रवेश केला. दुर्गेची प्रार्थना करून त्यांनी स्वत:ची सर्व शस्त्रे उतरवली; कारण गदा, गांडीवधनुष्य, खड्ग ही पांडवांची लक्षणच होती. त्यांनी ही शस्त्रास्त्रे सतेज रहावी म्हणून ती शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली. कारण शमी वृक्षात अग्नी असतो अशी मान्यता आहे. अज्ञातवास संपण्याच्या दिवसांत कौरवांनी विराटाच्या गायी पळवण्याचा घाट घातला. त्यावेळी याच दसऱ्याच्या दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. म्हणून या शमी वृक्षाची प्रार्थना करून त्याच्या मुळाशी अपराजिता देवीची पूजा करतात. या शमीच्या प्रार्थनेचा मंत्र असा -
‘‘शमी शमयते पापम् शमी शत्रू विनासिनी
धारीणी अर्जुनस्य बाणानाम् रामस्य प्रियवादीनी’’