कर्नाटकला हवे आणखी दोन टीएमसी पाणी
By Admin | Updated: May 14, 2017 00:02 IST2017-05-14T00:02:37+5:302017-05-14T00:02:37+5:30
महाराष्ट्राकडे मागणी : अद्याप निर्णय नाही

कर्नाटकला हवे आणखी दोन टीएमसी पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : कर्नाटकात विजापूर परिसरात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. एप्रिल महिन्यात कर्नाटकसाठी दोन टीएमसी पाणी सोडल्यानंतर आणखी दोन टीएमसी पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
कर्नाटक सीमाभागात जानेवारीतच कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील उगार कुडचीसह परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकसाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर एप्रिल महिन्यात पाणी सोडण्यात आले. मात्र सध्या विजापूर परिसरात पाणीटंचाई तीव्र झाल्याने कर्नाटक शासनाने आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. कोयना धरणात पाणीसाठी अपुुरा असल्याने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. म्हैसाळ योजना सुरू असल्याने सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. चार महिन्यात म्हैसाळसाठी पाच टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. जूनअखेर म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याने पाणीसाठ्याच्या वापराचा ताळमेळ घालून कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शुल्काऐवजी पाणी
कर्नाटकाला सोडलेल्या पाण्यासाठी शुल्क आकारणी न करता कर्नाटकातून जत व अक्कलकोट परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे. गतवर्षी व चालूवर्षी दिलेले पाणी अद्याप कर्नाटकाकडून परत मिळालेले नाही.