कर्नाटकात उद्योजकांना 'बुरे दिन'
By Admin | Updated: May 28, 2015 00:59 IST2015-05-28T00:23:38+5:302015-05-28T00:59:29+5:30
मुरगेश निराणी : राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत, काँग्रेस सरकारमुळे उद्योगवाढीला ब्रेक

कर्नाटकात उद्योजकांना 'बुरे दिन'
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर महाराष्ट्रातील उद्योजकांना कर्नाटकात या म्हणून एकिकडे कर्नाटक सरकार पायघड्या घालत असताना दुसरीकडे कर्नाटकातील उद्योजक राज्यात पुरेशा दर्जेदार सेवासुविधा मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना ‘बुरे दिन’ आले आहेत. परिणामी, बाहेरच्या राज्यात जाण्याच्या मानसिकतेत ते आहेत. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.
निराणी एका कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. त्यावेळी त्यांच्याशी बातचित केली. गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक कर्नाटकात जाण्याचा इशारा देत आहेत; त्यामुळे कर्नाटकात उद्योगवाढीचे धोरण काय,
असे विचारले असता ते म्हणाले, कर्नाटकात भाजप सत्तेवर असताना उद्योजकांना चांगले दिवस होते. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना हत्तरगी (ता. हुक्केरी) जवळ ‘एसईझेड’मध्ये मोठा आयटी उद्योग आला आहे. सलग तीन वर्षे आम्ही बंगलोरमध्ये जागतिक स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन (मेळावा) भरविला होते. जिल्हानिहाय कोणते उद्योग चालू शकतात, याचा आराखडा तयार केला होता. इच्छुक उद्योजकांना भूखंडही दिले होते.
दरम्यान, सन २०१३ मध्ये कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला अन् उद्योगवाढीला ब्रेक लागला. आम्ही तयार केलेला आराखडा धूळ खात पडून आहे. राज्यात नवे मोठे उद्योग आणण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत; त्यामुळे कर्नाटकातील उद्योजक नाराज आहेत. पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना ‘बुरे दिन’ आले आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक बाहेरच्या राज्यांत जाण्याच्या मानसिकतेत आहेत.
नव्या साखर कारखान्यांना परवाना नको
कारखानदारी वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढत आहे. साखरेचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी पुढील पाच वर्षांत नव्या साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन, सहविद्युत प्रकल्प अशा माध्यमांतून अडचणीतील साखर उद्योगाला सावरणे शक्य आहे, असेही निराणी यांनी सांगितले.