करकरे यांची हत्या ब्राह्मण्यवाद्यांकडून
By Admin | Updated: December 31, 2014 00:57 IST2014-12-31T00:56:19+5:302014-12-31T00:57:36+5:30
शमशुद्दीन मुश्रीफ : मालेगाव बॉम्बस्फटातील आरोपींचे पुरावे करकरेंच्या हाती

करकरे यांची हत्या ब्राह्मण्यवाद्यांकडून
कोल्हापूर : महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या ब्राह्मण्यवाद्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे असणारा लॅपटॉप करकरेंना मिळाले होते. या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड केलेल्या संभाषणाच्या व्हिडिओ आणि आॅडिओ क्लिप्सचा उलगडा करकरे करत होते. हा उलगडा समोर आल्यास देशप्रेमाच्या नावाखाली सुरू असलेले दहशतवादी कारवाईचे पितळ उघडे पडेल, या भीतीपोटीच ब्राह्मण्यवादी संघटनांनी हेमंत करकरेंचा खून केला, असे प्रतिपादन माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केले.
येथील श्रमिक प्रतिष्ठान, समता संघर्ष समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने शाहू स्मारक येथे आज, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘हू किल्ड करकरे’ या व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाहू स्मारक भवन, तसेच भवनाचे प्रांगण गर्दीने तुडुंब भरले होते.
मुश्रीफ म्हणाले, मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींच्या संभाषणाची व्हिडिओ आणि आॅडिओवर करकरेंचा तपास सुरू होता.
कट्टर ब्राह्मण्यवाद्यांचा समावेश असलेल्या अभिनव संघटनेशी हे आरोपी संबंधित होते. या
घटनेतील पुरावे समोर आल्यास ब्राह्मण्यवाद्यांचा चेहरा देशद्रोही म्हणून समोर येईल, या भीतीने करकरेंना संपवण्याचा डाव ब्राह्मण्यवाद्यांनी आखला होता.
देशाच्या सुरक्षा क्षेत्रातील अतिउच्च असलेल्या आयबीमधील उच्चपदस्थ ब्राह्मण्यवाद्याचाही सहभाग आहे. कारण अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने भारताच्या रॉ या संघटनेला लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी मुंबईत येत असल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार रॉने आयबीला ही माहिती दिली होती. पण आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना तसेच वेस्टर्न नेव्हल कमांडला दिली नाही. आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली असती, तर २६/११चा हल्ला टळला असता. पण जाणूनबुजून आयबीने ही माहिती दिली नाही, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.
मुंबई हल्ल्यानंतर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलीस नियंत्रण कक्षाकडे केलेल्या फोनचे टॅपिंग, करकरेंचा मोबाईल, सीएसटीच्या मेन लाईनचे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे
बंद असणे, कामा हॉस्पिटलमधील गोळीबार, या प्रकरणातील
अंतर्गत रिपोर्ट आदी बाबींचा
विचार आरोपपत्र दाखल करताना करण्यात आलेला नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी उच्चस्तरीय यंत्रणेने हस्तक्षेप केला आहे, या सगळ्या बाबींचा उल्लेख मी ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकात केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.
या पुस्तकात मी २६/११च्या हल्ल्याबाबत करण्यात आलेल्या तपासावर जे सप्रमाण प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांना खोडून काढण्यासाठी कुणीही पुढे यावे, असे खुले आव्हानही मुश्रीफ यांनी यावेळी दिले.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, धर्मांध शक्ती व भांडवलशाहीची युती झाल्याने देश संकटात सापडला आहे. देश अशांत असल्याशिवाय अशा शक्तींचा उद्देश सफल होत नाही. यासाठी नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
जाहिराती करून आपले उत्पादन लोकांच्या गळी उतरवून त्यांना अधिक गरीब करणे ही भांडवलशाहीची किमया आहे, तर सत्यनारायणाची पूजा घालून कर्मकांडात लोकांना अडकविणे ही धर्मांधतेची किमया आहे. १९५४ मध्ये संत गाडगे महाराजांनी सत्यनारायणाच्या पूजेबाबत भटशाहीविरुद्ध आवाज उठविला, परंतु त्याचा काहीच फरक आज पडलेला दिसत नाही.
कारण आजची शिकली सवरलेली पिढी त्याच्या मागे लागली आहे. जास्तीत जास्त दंगली या हिंदूनीच केल्या आहेत. आपल्याच देव-देवतांची विटंबना करून या दंगली घडवून समाजात अशांतता माजविण्याचे काम झाले आहे. आम्हाला कुणाची भीती नाही. कारण आमचा पाया हा नीती, चारित्र्य आणि शील यावरच आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमे्रड चंद्रकात यादव यांनी केले. सूत्रसंचालन सतीशचंद्र कांबळे यांनी केले.
यावेळी पेशावर येथील दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या शाळकरी मुलांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
५
शाहूंच्या भूमीत शिवसेना-भाजपचे आमदार कसे ?
ज्या राजर्षी शाहंूनी पुरोगामी विचारांना पाठबळ दिले. त्यांच्या कार्यात ज्यांनी बॉम्ब पेरून आडवे येण्याचे काम केले, ज्यांनी नेहमीच शाहू महाराजांना त्रास दिला. अशा शक्तीच्या लोकांचे प्रतिनिधी कोल्हापुरात निवडून येतात कसे? अशी विचारणा करत कोळसे-पाटील यांनी शिवसेना-भाजपकडे बोट दाखविले.
हिंदुत्ववाद्यांना चपराक...
मुश्रीफ यांचे व्याख्यान हे धर्मविरोधी असल्याचे सांगून कालच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देवून हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सभागृहाबाहेर साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तासाठी होते. ज्यांनी कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती, त्यातील फारसे कार्यकर्ते सभागृहाकडे फिरकले नाहीत. या व्याख्यानास झालेली गर्दी पाहून हिंदुत्ववाद्यांना लोकांनीच परस्पर चपराक दिल्याची प्रतिक्रिया गोविंद पानसरे यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.
अर्ध्या तासांत ९० हजारांची विक्री
शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाच्या खरेदीस तसेच २६/११ च्या हल्ल्याच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या कात्रणाच्या प्रती, त्यांच्या भाषणांच्या सीडींच्या खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या अर्ध्या तासांत सुमारे ९० हजार रुपये किमतीची पुस्तके सीडी आणि वर्तमानपत्रांची कात्रणे विकली गेली.
शिवसेनाप्रमुखांचा संबंध अंडरवर्ल्डशी
शिवसेनाप्रमुखांचा संबंध अंडरवर्ल्ड दाऊदशी असल्याचा आरोपही ब्राह्मण्यवादी करत होते. शिवसेनेला दुय्यम लेखण्याची भूमिका त्यांनी नेहमीच स्वीकारली आहे, ही बाब शिवसैनिकांना कशी चालते, अशी खंतही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.