उदगावात कर्नाटकातील विद्यार्थ्यांना कन्नड शिक्षण
By Admin | Updated: January 17, 2017 00:20 IST2017-01-17T00:20:14+5:302017-01-17T00:20:14+5:30
कामगारांच्या सहाशे मुलांना शिक्षण : उदगाव, चिंचवाडमधील शाळांचा पुढाकार

उदगावात कर्नाटकातील विद्यार्थ्यांना कन्नड शिक्षण
संतोष बामणे ल्ल जयसिंगपूर
महाराष्ट्र शासनाच्या सारे शिकूया, पुढे जाऊया या धोरणाप्रमाणे एकही मूल निरक्षर राहू नये यासाठी शासन युद्धपातळीवर लक्ष देऊन शिक्षणाची मोहीम राबवीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील उदगाव, चिंचवाड येथे वीटभट्टीवर काम करणाऱ्या कर्नाटकातील कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील मुलेही महाराष्ट्रामध्ये कन्नड भाषेत शिक्षित होत आहेत.
दुष्काळी भाग व हाताला काम न मिळाल्याने कर्नाटकातील मजूर तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी येतात. साखर कारखान्यांच्या ठिकाणी साखरशाळा चालविल्या जातात. यामध्ये ऊसतोड मजूर हे मराठवाड्यातील असल्याने मराठी शिक्षण त्यांच्या मुलांना मिळते. मात्र, वीटभट्टीच्या कामावर आलेल्या कर्नाटकातील कामगारांची मुले निरक्षर राहू नयेत यासाठी उदगाव येथील देसाई विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उदगाव टेक्निकल हायस्कूल, चिंचवाड कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिरच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कन्नड भाषेतील शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत.
२००५ पासून उदगाव, चिंचवाड परिसरात वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या मजुरांची मुले निरक्षर राहत असल्याचे पाहून २००७ पासून कानडी भाषेतील शिक्षण या मुलांना उपलब्ध करून दिले आहे. यंदाच्या वर्षी चिंचवाड येथे ३५, तर उदगाव येथे ४२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुपारच्या जेवणाची सोय, पुस्तके, वह्या, पेन, कपडे यांची सोयही करून दिली आहे. तसेच वीटभट्टीच्या मुलांसाठी अनेक सामाजिक संस्था मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. ही शाळा चालविण्यासाठी सुरगोंडा पाटील, सतीश पाटील, मुख्याध्यापक विजय कोळी, शोभा कोळी, मुख्याध्यापक रावसाहेब इंगळे, गटविस्तार अधिकारी वांद्रे, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत.