अपघातात कामेवाडीचा युवक ठार
By Admin | Updated: November 16, 2014 00:50 IST2014-11-16T00:40:43+5:302014-11-16T00:50:06+5:30
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक

अपघातात कामेवाडीचा युवक ठार
कोवाड : चाकण (जिल्हा पुणे) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात राजू भरमानी पाटील (वय २९, रा. कामेवाडी, ता. चंदगड) व विक्रम मनोहर डोंगळे (२४, रा. कृष्णानगर, चिखली) हे दोघे युवक ठार झाले, तर राजूचा चुलत भाऊ आशिष बळवंत पाटील हा जखमी आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
यासंदर्भात माहिती अशी, राजू व आशिष हे दोघेजण अभियांत्रिकीची पदवी घेऊन नोकरी शोधण्यासाठी पुण्याला गेले होते.
यावेळी त्यांचा वर्गमित्र विक्रम हाही त्यांच्याबरोबर होता. चाकण येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तिघांनीही अर्ज केला होता. त्या कंपनीमध्ये मुलाखत देऊन हे तिघेही एकाच मोटारसायकलवरून परत येताना तळेगाव (चाकण) येथील खरातवाडीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आयशर टेम्पोला मागून मोटारसायकलची (एमएच 0९ सीएच २६४२) जोराची धडक बसल्याने विक्रम डोंगळे हा युवक जागीच ठार झाला, तर राजू पाटील याला रुग्णालयात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले.
राजू हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. वडील भरमानी पाटील यांची घरची बेताची परिस्थिती असतानाही मोठ्या जिद्दीने त्यांनी त्याला इंजिनिअर केले होते.
त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे शैक्षणिक कर्जही घेतले होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिकामे बसण्यापेक्षा दोघेही भाऊ नोकरीसाठी पुण्याला गेले होते; पण नोकरी करण्याऐवजी काळाने त्याच्यावर घाला घातल्याने त्याचे नोकरीचे स्वप्न अधुरे राहिले.
आज सायंकाळी राजूचा मृतदेह कामेवाडी येथे आणल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद चाकण पोलिसांत झाली असून, दिगंबर कदम यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. (प्रतिनिधी)