काळसे धनगरवाडीवासीय समस्याग्रस्त

By Admin | Updated: July 5, 2014 00:01 IST2014-07-04T22:58:07+5:302014-07-05T00:01:33+5:30

वाडीकडे दुर्लक्ष : ना धड रस्ता-पाणी, ना सर्व घरांना वीज

Kalsa Dhanwarwadi issue problem | काळसे धनगरवाडीवासीय समस्याग्रस्त

काळसे धनगरवाडीवासीय समस्याग्रस्त




चौके : मालवण तालुक्यातील काळसेच्या अतिउंच आणि डोंगराळ भागामध्ये धनगर समाजाचे स्त्री-पुरूष, मुले असे जवळजवळ १०० रहिवासी गेली कित्येक वर्षे कायमस्वरूपी वास्तव्य करून आहेत. या वस्तीतील स्त्री-पुरूष गावात मोलमजुरी करून आपला संसार चालवत आहेत. धामापूर काळसे गावाचा झपाट्याने विकास होत असताना धनगरवाडीवासियांना मात्र ना धड रस्ता ना पाण्याची सोय ना सर्व घरांना वीज आहे. त्यामुळे त्यांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या धनगर समाजातील लोकांची घरे ही कच्च्या स्वरूपातील असून दुसऱ्या लोकांच्या मालकीच्या जमिनींमध्ये आहेत. म्हणून गोरगरीबांच्या निवासासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. त्यातील काही योजनेंतर्गत हक्काची घरे बांधून मिळावी, अशी या लोकांची मागणी आहे.
या धनगरवाडीतील धनगर समाजाचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो मुबलक पाणीपुरवठ्याचा. दोन वर्षापूर्वी धनगरवाडीच्या लोकांसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्याठिकाणी विहीर खोदण्यात आली. परंतु दुर्दैवाने या विहिरीला थेंबभरही पाणी मिळाले नाही. त्यामुळे धनगरवाडीपासून सुमारे दोन कि.मी.च्या परिसरात त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा कुठलाच स्त्रोत नाही.
सध्या या वाडीतील स्त्रिया, मुले २ कि.मी.पेक्षा जास्त अंतरावरून डोक्यावरून पाणी घेऊन येतात. पण हे पाणी आणतानाही त्यांना विहिरीच्या मालकांची शिवीगाळ, जाच सहन करावा लागतो. त्यामुळे मालकाची नजर चुकवून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी मतदानापुरते धनगरवाडीत येणाऱ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमच्या या मुख्य समस्येकडे लक्ष देऊन आम्हाला धामापूर नळयोजनेचे किंवा मुबलक पाणी असणारी दुसरी विहीर किंवा बोअरवेल खोदून मिळावी, अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. काळसे धनगरवाडीतील तिसरी समस्या म्हणजे मुख्य रस्त्यापासून धनगरवाडीला जोडणारा डांबरी अथवा मातीचाही रस्ता नाही. सध्या या वाडीपर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे.
परंतु ती पायवाट एवढी खडकाळ आणि खड्ड्यांची आहे की त्यावरून चालणेसुद्धा मुश्कील होते. या रस्त्यावरून कुठलेही वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या रूग्णाला डोलीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. हे अंतरही जास्त असल्याने त्यांची दमछाक होते. रस्ता नसल्यामुळे या वाडीतील काही मुले शाळेतही जात नाहीत. त्याचप्रमाणे या वाडीतील काही घरे अजूनही अंधारात आहेत. त्यांना अजूनही विजेचा पुरवठा होत नाही.
मुख्य रस्त्यापासून धनगरवाडीपर्यंत डांबरी रस्ता मिळावा, त्यावर दिवाबत्तीची सोय व्हावी, उर्वरित घरांना विजेचा पुरवठा व्हावा आणि पिण्याच्या पाण्याची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी, अशा मागण्या धनगरवाडीतील सर्व रहिवाशांनी शासनाकडे केल्या आहेत. धनगरवाडीतील रहिवाशांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मालवण तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही त्याचा अद्यापपर्यंत काहीच उपयोग झाला नाही.
मुलभूत सुविधांपासूनही वंचित अशा धनगरवाडीतील जनतेच्या पाठीशी तारणहार म्हणून कोणीतरी उभे राहणे ही सध्याची गरज आहे. (वार्ताहर)

Web Title: Kalsa Dhanwarwadi issue problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.