‘काळम्मावाडी, राधानगरी’ सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:50 IST2019-07-20T00:50:24+5:302019-07-20T00:50:29+5:30
कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास ...

‘काळम्मावाडी, राधानगरी’ सुरक्षित
कोल्हापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे लघुपाटबंधारे तलाव फुटीच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने कोल्हापुरातील सर्वच धरणांचे आॅडिट करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे. यामध्ये ‘वारणा’, ‘दूधगंगा’ (काळम्मावाडी), ‘राधानगरी’ या प्रमुख धरणांसह सर्वच धरणे पूर्णपणे सुरक्षित आहेत. सहा तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून, पडसाळी, केचरकरवाडी या तलावांची डागडुजी केली आहे.
जिल्ह्यात ‘वारणा’, ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘तुळशी’ या मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्प ४०च्या पुढे आहेत. या धरणांची देखरेख ‘उत्तर’ व ‘दक्षिण’ विभागांमार्फत केली जाते. या धरणांचे आॅडिट विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी जागेवर जाऊन केले. यामध्ये ‘वारणा’, ’दूधगंगा’, ‘राधानगरी’ व ‘तुळशी’ या प्रमुख धरणांसह ‘कडवी’, ‘कासारी’ व ‘कुंभी’ या प्रकल्पांची तपासणी केली. हे प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आहेत.
कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी २९ प्रकल्पांना भेटी देऊन त्यांचे आॅडिट केले. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील पडसाळी, केचरकरवाडी यांच्या सांडव्यातून पाणी जात असल्याने संबधित ग्रामस्थांमध्ये भीती होती; पण पडसाळी तलावाच्या सांडव्याच्या गळतीचे काम पूर्ण झाले आहे. केचरवाडीच्या तलावाच्या इनटेकवेलचा प्रश्न २००९ पासून होता, त्याचीही दुरुस्ती करण्यात आली. त्याशिवाय सहा-सात तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रत्येक तलावावर
कर्मचाऱ्यांची नियुक्ती
प्रमुख धरणांवर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आहेतच; पण लहान धरणे, तलावांच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते. आता बहुतांशी धरणे व तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे दक्षता म्हणून तिथेही कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी स्थानिकांना मानधनावर घेतले आहे.