काळम्मावाडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू
By Admin | Updated: September 10, 2014 23:54 IST2014-09-10T23:26:39+5:302014-09-10T23:54:29+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : पिण्याच्या पाण्यासह विविध प्रश्न

काळम्मावाडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण सुरू
कोल्हापूर : दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या संकलन-दुरुस्तीसाठी न्यायालयाचा आदेश होऊनही संकलन-दुरुस्तीसाठी दिलेली प्रकरणे झालेली नाहीत. ती दुरुस्ती करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ आज, बुधवारपासून काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
संघटनेचे उपाध्यक्ष धाकू शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, अशोक झंजे, बाबूराव कांबळे, दिलीप केणे, विठ्ठल पाटील, सुनील धोंड यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
दूधगंगा प्रकल्पातील एकूण २९ विस्थापित वसाहती असून १० वसाहतींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून त्यामध्ये मुडशिंगी (ता. करवीर) येथील धरणग्रस्तांना पिण्याचे पाणी लिटरप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. ही वस्तुस्थिती संंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहिली आहे. वसाहतींमध्ये जवळपास तीन कोटी रुपयांच्या नागरी सुविधा मंजूर केल्या. त्यात काही ठिकाणीच नागरी सुविधा चालू असून बाकी वसाहतींमध्ये काम करण्याचे आदेश नाहीत. खोची (ता. हातकणंगले) या वसाहतीसाठी वाढीव भूखंड मंजूर असून, हे काम नगररचनाकडे पाठविले. ते अद्याप रेंगाळले असून त्याची तत्काळ पूर्तता व्हावी. पाटगाव प्रकल्पाची उंची वाढल्याने २३ प्रकल्पग्रस्त विस्थापित झाले, त्यांना भूखंड वाटपाची सुविधा युद्धपातळीवर करावी. प्रकल्पग्रस्तांना जमीनवाटपाचे काम बंद पूर्ववत सुरू करावे. प्रकल्पग्रस्तांना पूर्वी वाटप झालेल्या जमीनींचा तातडीने कब्जा देण्यात यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)