कडकडीत ‘बंद’ने कोल्हापूरकरांचा सलाम
By Admin | Updated: February 22, 2015 01:07 IST2015-02-22T00:50:50+5:302015-02-22T01:07:22+5:30
पानसरेंना श्रद्धांजली : विद्यार्थ्यांचीही कॉलेज, शाळांकडे पाठ; कडेकोट बंदोबस्त

कडकडीत ‘बंद’ने कोल्हापूरकरांचा सलाम
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपल्याचे समजताच शनिवारी कोल्हापूर शहर शोकसागरात बुडाले. व्यावसायिकांनी स्वत:हून व्यवसाय बंद ठेवले. रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. त्यामुळे शहराने दिवसभर सन्नाटा अनुभवला. शाळा, महाविद्यालये सुरू होती; पण ती बंद स्थितीत असल्यासारखीच होती. रस्त्यांवर नीरव शांतता असल्याने केएमटी बसेसही प्रवाशांअभावी धावल्या. केएमटी प्रशासनाने दसरा चौकातील बसेसचे मार्ग बदलले होते.
पानसरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी सकाळी बहुतेकांना वृत्तपत्रे व सोशल मिडियाच्या माध्यमातून समजली. त्यामुळे सकाळपासून शहरात शांतता पसरली होती. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, मिरजकर तिकटी, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी, महाद्वार रोड, गंगावेश, पापाची तिकटी, महापालिका परिसर, बिंदू चौक, उमा टॉकीज, शिवाजी उद्यमनगर ही वर्दळीची ठिकाणे ओस होती. पानसरे हे कष्टकरी-कामगारांचे नेते होते; त्यामुळे खाद्यपदार्थांच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या बंद होत्या; तर इतर सर्व व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. दुकाने बंद असल्याने रस्त्यांवर तुरळक दुचाकी व तीनचाकी दिसत होत्या.
आठवड्याच्या दर शनिवारी शाळा सकाळी असतेच; पण शनिवारपासून बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाल्याने शहरातील बहुतांश शाळा सकाळी दहाच्या आत सोडण्यात आल्या होत्या. अनेक पालकांनी मुला-मुलींना स्वत: शाळेत सोडून दहा वाजता परत आणले.
एस.टी.बसेस सुरू
शनिवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) ग्रामीण भागातील बसेस बंद केल्या नव्हत्या; पण, या बसेसना विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर प्रवाशांची तुरळक गर्दी होती.
हिंदुत्ववादी कार्यालयात बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी सकाळपासून शहरातील विविध हिंदुत्ववादी कार्यालयांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
महाविद्यालये सुरू; पण...
शहरातील काही महाविद्यालये बंद होती, तर काही सुरू होती; पण त्यांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेचे गोविंद पानसरे हे संचालक होते. सकाळी संस्थेचे अध्यक्ष डी. बी. पाटील व न्यू कॉलेजचे प्राचार्य एन. व्ही. नलवडे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक, कर्मचारी व सदस्य, आदींनी पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली.