कळंबा टोलनाका फोडला

By Admin | Updated: April 5, 2015 00:26 IST2015-04-05T00:26:52+5:302015-04-05T00:26:52+5:30

कोल्हापुरात वातावरण तंग : कर्मचारी पसार

Kalamba tolana bolted | कळंबा टोलनाका फोडला

कळंबा टोलनाका फोडला

कोल्हापूर : गारगोटीहून कोल्हापूरकडे येणारी कार अडविल्यावरून चालक व कळंबा टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीमधून संतप्त नागरिकांनी कळंबा टोलनाका फोडला. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
हा प्रकार समजताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, टोलनाक्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आय.आर.बी. कंपनीचे कर्मचारी उमाकांत नारायण राजमाने (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी दिली. अज्ञात ५० ते ६० जणांनी टोलनाका व केबिन, खुर्च्यांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गारगोटी (ता. भुदरगड) येथील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबीयांसह नवीन वॅगन आर या कारमधून सकाळी कोल्हापूरला नातेवाइकांकडे येण्यास निघाले. जाधव यांची कार कळंबा टोलनाक्यावर आली. नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोलची मागणी केली. यावेळी जाधव हे ‘टोल देणार नाही’, पर्यायी मार्गाने जातो, असे सांगून कार मागे घेऊ लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी कारमागे लोखंडी बॅरिकेटस लावले. गाडी पाठीमागे घेत असताना बॅरिकेटस गाडीला घासले. यामुळे सुरेश जाधव यांचा राग अनावर झाला. यावेळी गाडीत बसलेल्या दोन महिलांसह त्यांचे इतर बंधू हे कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालू लागले. हा वाद सुरू असतानाच नागरिक हळूहळू एकत्र जमू लागले. या वादातून संतप्त जमावाने टोलनाक्यावरील केबिन व दिसेल त्या साहित्याची तोडफोड सुरू केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
या प्रकारानंतर काही काळ टोलवसुली बंद होती. पुन्हा दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी केबिन उभी करून पुन्हा टोलवसुली सुरू केली. (प्रतिनिधी)

Web Title: Kalamba tolana bolted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.