कळंबा तलावाचे पाणी १५ फुटांवर

By Admin | Updated: May 8, 2015 00:19 IST2015-05-07T23:19:20+5:302015-05-08T00:19:19+5:30

उपनगरातील पाणीप्रश्न गंभीर : नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले

Kalamba lake water is 15 feet away | कळंबा तलावाचे पाणी १५ फुटांवर

कळंबा तलावाचे पाणी १५ फुटांवर

अमर पाटील -कळंबा कळंबा व उपनगरांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावातील पाण्याची पातळी ऐन उन्हाळ्यात अवघी पंधरा फुटांवर आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावाचा वापर मोठ्या प्रमाणावर अंघोळ, जनावरे व कपडे धुण्यासाठी होतो.कळंबा तलावाचे एकूण क्षेत्र ६३.९३ हेक्टर व पाणी साठवण क्षमता ७.३५ दशलक्ष घनफूट आहे. गेल्या पाच वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने व तलावातील गाळ न काढल्याने पाणीसाठा कमी होतो. या तलावातून कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, जरगनगर व अन्य उपनगरांस पाणीपुरवठा केला जातो. कात्यायनी टेकड्यांतून वाहणारे पाणी हा तलावाचा मुख्य जलस्रोत आहे; पण बेसुमार वृक्षतोडीने तो कमी झाला आहे.
तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने रोज एक तास येणारे पाणी पंधरा मिनिटे सोडण्यात येत आहे. पाणी समस्येचे गंभीर स्वरूप नागरिकांनी लक्षात घेऊन घरोघरी मोठ्या पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत; पण तलावातून येणारे पाणी पिण्यास योग्य नाही. त्याचा उग्र वास येत असून, ते हिरवट असल्याची तक्रार सर्वच नागरिक करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना बोअरवेल, विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी पालिका व पाटबंधारे विभागाने गाळ उपसा केल्यामुळे पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे टंचाई नव्हती; पण यंदा पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' अशी अवस्था झाल्यामुळे कळंबावासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.


४तलाव पूर्ण आटला असून, ज्याला ‘डेड वॉटर’ (मृत पाणी) म्हणता येईल, असेच पाणी आता शिल्लक राहिले आहे.
४राजर्षी शाहू महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते. तलाव जरी पूर्ण क्षमतेने आटला तरी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तलावात मजबूत विहिरी खोदल्या होत्या. सध्या त्या उघड्या पडल्या आहेत. प्रदूषणाने त्यातील पाणीही वापरण्यासाठी योग्य राहिलेले नाही.
४तलावाचे सुशोभीकरण करण्याची पालिकेची भीमगर्जना आता हवेत विरली असून, सुशोभीकरणाचा निधी सात कोटी ७५ लाख वर्षापूर्वी पालिका खात्यावर जमा; पण कार्यवाही मात्र शून्य.
४तलाव जरी जीवन प्राधिकरणाने पालिकेकडे हस्तांतरित केला असला, तरी तलावाच्या पाण्याचा वापर कळंबा ग्रामपंचायतच जास्त करते. त्यामुळे तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेइतकी ग्रामपंचायतीची आहे; पण नोटीसबोर्ड लावण्यापलीकडे ठोस कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही.

Web Title: Kalamba lake water is 15 feet away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.