रंगकर्मींचे चौकाचौकांत ‘कलाबाजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:54+5:302021-09-09T04:30:54+5:30
कोल्हापूर : सण-उत्सवांना आता सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अटी-शर्तींसह परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारपासून ...

रंगकर्मींचे चौकाचौकांत ‘कलाबाजार’
कोल्हापूर : सण-उत्सवांना आता सुरुवात होत असून या पार्श्वभूमीवर नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अटी-शर्तींसह परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारपासून कोल्हापुरातील रंगकर्मींनी ‘कलाबाजार’ या अभिनव आंदोलनाला सुरुवात केली. याअंतर्गत पुढे आठ दिवस शहरातील चौकाचौकांत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून कलाकारांच्या व्यथांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आंदाेलनाची सुरुवात केशवराव भोसले नाट्यगृहापासून झाली. यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना १५ सप्टेंबरपासून नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरात कला-सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. २०१९मध्ये महापूर आल्याने उत्सवाचे वातावरण नव्हते. त्यानंतर आता सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट सुरू असल्याने कलाकार, कलापथक, निर्माता व बॅकस्टेजला काम करणारे तंत्रज्ञ कामगार अशा सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या बाजारपेठा, सर्व व्यसाय उद्योग सुरू असल्याने नाट्यगृह सुरू करावेत व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, अशी मागणी राज्यभरातील रंगकर्मींनी केली आहे. मात्र, शासनाने ५ नाेव्हेंबर नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणेशोत्सव सुरू होत आहे, पुढे नवरात्रौत्सव आणि दिवाळी आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे उत्सवांमध्ये कलाकारांना गणेश मंडळांच्या मांडवात छोटेखानी कार्यक्रम किंवा रस्त्यावरील चौकात नाटिका, गाणी, नृत्य अशा कलांच्या सादरीकरणाची परवानगी मिळावी, अशी रंगकर्मींची मागणी आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलाबाजार हे अभिवन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या वेळी कलाकारांसाठी मदतफेरी काढण्यात आली.
याअंतर्गत पुढील आठ दिवस शहरातील चौकाचौकांत हे आंदोलन होणार असून यात कलाकार वेगवेगळ्या कला सादर करणार आहेत. मुकुंद सुतार, प्रसाद जमदग्नी, सागर बगाडे, सुनील घोरपडे, महेश भूतकर, महेश कदम, दिनेश माळी, समीर भोरे, रणजित बुगले, वैदेही झुरळे, स्वानंद जाधव, स्मिता कोळी, मंजिरी देवण्णावर, सीमा मकाेटे यांच्यासह रंगकर्मी सहभागी झाले होते.
---
फोटो नं ०८०९२०२१-कोल-कलाबाजार
ओळ : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर बुधवारी कोल्हापुरातील रंगकर्मींनी १५ सप्टेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यगृहांना परवानगी मिळावी यासाठी कलाबाजार या अभिनव आंदोलनाला सुरुवात केली. (छाया : नसीर अत्तार)
---