कळेत शिवसेना-‘जनसुराज्य’मध्येच सामना

By Admin | Updated: January 20, 2017 00:01 IST2017-01-20T00:01:29+5:302017-01-20T00:01:29+5:30

दहा वर्षांनंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण : दिग्गज कार्यकर्ते कसून तयारीला लागले

Kalaat Shivsena - 'Sangsurajaya' match | कळेत शिवसेना-‘जनसुराज्य’मध्येच सामना

कळेत शिवसेना-‘जनसुराज्य’मध्येच सामना

सरदार काळे ---कळे  कळे जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण दहा वर्षांनंतर खुल्या प्रवर्गाचे झाल्याने दिग्गज कार्यकर्ते कसून तयारीला लागले आहेत. २०१२च्या निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनसुराज्य, शेकाप अशी बहुरंगी लढत झाली. शिवसेनेने ही जागा जिंकली होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनसुराज्य, रिपाइं, शेकाप, आदी पक्ष संघटनांच्या आघाड्या, युती कशा होतात, यावरच चित्र अवलंबून आहे.
काँग्रेस, जनसुराज्य, शिवसेना, भाजप यांच्यातच खरा सामना होईल. आरक्षण सर्वसाधारण खुले झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, उमेदवारांची निवड करताना नेतेमंडळींची दमछाक होणार हे निश्चित आहे.
२०१२ सालच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी विकासकामांच्या जोरावर व कार्यकर्त्यांच्या बळावर सुजाता वसंत पाटील यांना निवडून आणून काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य यांना धक्का दिला होता, तर पंचायत समितीच्या कळे गणातून शिवसेनेच्याच भारती संभाजी पाटील या निवडून आल्या होत्या. वेतवडे गणातून जनसुराज्य पक्षाकडून विलास गणपती पाटील यांना निवडून आणून माजी मंत्री विनय कोरे यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला होता.
कळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता गत २०१२च्या निवडणुकीत काँग्रेस व जनसुराज्य यांच्यामध्ये मतांची विभागणी झाल्याने शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस व जनसुराज्य युती होण्याची शक्यता आहे. याबाबत पणुत्रे येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात माजी मंत्री विनय कोरे यांनीही अनुकूलता दर्शविली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक संदीप नरके यांच्या एकत्रित विचाराने जनसुराज्य पक्षाबरोबर युती केल्यास निश्चितच त्यांच्या उमेदवारीची ताकद भक्कम होणार आहे. असे झाल्यास आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेकडून तितक्याच ताकदीचा सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कळेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्जेराव ज्ञानदेव पाटील यांनी एकहाती विजय मिळविल्याने तेच या निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य प्रबळ उमेदवार मानले जात असले, तरी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते, सक्रिय सभासद, तालुका अध्यक्ष सर्जेराव दत्तू मोळे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील यांनी पती वसंत पाटील व दीर विलास पाटील यांच्या साथीने गत पाच वर्षांत गावा-गावांत विविध विकासकामे केली आहेत. विलास शंकर पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंचायत समितीच्या गत निवडणुकीत जनसुराज्य पक्षाकडून निवडून आलेले विलास गणपती पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलास पाटील यांचीही कार्यकर्त्यांची फळी मोठी असल्याने काँग्रेसकडून त्यांना उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. २००७ च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडून आलेले बाळासो मोळे हे आता काँग्रेसमधून इच्छुक आहेत. त्याचबरोबर कळेचे माजी उपसरपंच, भैरवनाथ तालमीचे अध्यक्ष रामचंद्र इंजुळकर, बापू पाटील, सरदार पाटील , सुरेश पाटील, विश्वास आंग्रे यांच्याही नावाची काँग्रेसमधून उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून संजय दिनकर पाटील, युवराज बेलेकर, इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून संभाजी कापडे इच्छुक आहेत.

२०१२ च्या लढती
१) सुजाता वसंत पाटील - शिवसेना - १०४३३
२) शालाबाई गणपती बेळेकेर - जनसुराज्य - ९५८३
३) उर्मिला गणपती मोळे - ४५८३

Web Title: Kalaat Shivsena - 'Sangsurajaya' match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.