शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:01+5:302021-02-20T05:11:01+5:30
कोल्हापूर : तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मूर्ती तयार करून, त्याची विक्री करून पोटपाणी चालवणारे; पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी ...

शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा अहेर
कोल्हापूर : तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मूर्ती तयार करून, त्याची विक्री करून पोटपाणी चालवणारे; पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या हातात नव्या कपड्यांचा अहेर देऊन पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांना घरोघरी पोओचवल्याबद्दल आभारही मानले.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जवळ आल्या की, रस्त्याकडेला परप्रांतांतून आलेल्या कलाकारांकडून महापुरुषांचे पुतळे तयार करण्याचे काम सुरू होते. रस्त्याकडेला निर्मिती आणि विक्री करणाऱ्या या कलाकार समाजामुळेच महापुरुषांचे पुतळे घरोघरी, मंडळात पोहोचतात; पण आतापर्यंत या कलाकारांशी खरेदी विक्रीपुरता संबंध यायचा. त्यांचे म्हणून कधी कौतुक झाले नव्हते. यावर्षीची शिवजयंती मात्र या कलाकारांसाठी अनोखा आनंद देणारी ठरली. या सत्काराने हे कलाकारही भारावून गेले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम तावडे हॉटेल मार्गावरील फुटपाथवरील विक्री केंद्रावर पाेहोचली. त्यांनी या कलाकारांच्या कुटुंबीयांचे आभार मानून त्यांना नवीन कपडे भेट दिले. यात मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे, ॲड. पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित भोसले, नीलेश सुतार, शाहीर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजित कांजर, सुजय देसाई, शर्वरी मानगावे, मदन परीट, बबलू ठोंबरे यांनी सहभाग घेतला.
फोटो :१९०२२०२१-कोल-संभाजी ब्रिगेड
फोटो ओळ:
रस्त्याकडेला पुतळानिर्मिती व विक्री करणाऱ्या कलाकारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचू शकल्याबद्दल शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने नवीन कपड्यांची भेट देऊन आभार मानले.