कागलच्या सभापती, उपसभापतींची शुक्रवारी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:27+5:302021-07-03T04:16:27+5:30
कागल : कागल पंचायत समितीच्या नूतन सभापती, उपसभापती निवड शुक्रवार (दि. ०९) जुलै रोजी होणार आहे. सभापतीपद मुश्रीफ ...

कागलच्या सभापती, उपसभापतींची शुक्रवारी निवड
कागल : कागल पंचायत समितीच्या नूतन सभापती, उपसभापती निवड शुक्रवार (दि. ०९) जुलै रोजी होणार आहे. सभापतीपद मुश्रीफ गटाकडे जाणार असल्याने रमेश तोडकर आणि जयदीप पोवार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. तर उपसभापतिपद संजय घाटगे गटाच्या मनीषा सावंत यांना निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
कागल पंचायत समितीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. सभापती, उपसभापतिपदांची विभागणी केली आहे. विद्यमान सभापती पूनम महाडिक (मंडलिक गट), उपसभापती अंजना सुतार(मुश्रीफ गट) यांनी सत्तावाटपाच्या धोरणानुसार राजीनामे दिल्याने आता नव्या निवडी होणार आहेत. रमेश तोडकर हे सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत, तर जयदीप पोवार हे राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. सभापतिपद हे खुले असून दोघांनीही मंत्री मुश्रीफ यांचेकडे सभापतिपदासाठी साकडे घातले आहे. पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ सात महिने उरला आहे.
चौकट
● खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या आधीच म्हणजे चार वर्षांपूर्वी कागल पंचायत समितीत हा प्रयोग झाला. राष्ट्रवादीचे पाच, शिवसेनेचे पाच असे सदस्य निवडून आल्याने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. शिवसेनेच्या पाच सदस्यांमध्ये मनीषा सावंत या संजयबाबा गटाच्या आहेत. या वेळी खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेच्या वाट्याला आलेले उपसभापतिपद सावंत यांना देऊन त्यांना न्याय दिल्याचे समजते.