जोतिबावर आगीने भाविकांची घुसमट
By Admin | Updated: April 3, 2015 01:05 IST2015-04-03T00:51:45+5:302015-04-03T01:05:40+5:30
मंदिरालगत आग : एक तास थरार; स्थानिक यंत्रणा ठरली कुचकामी

जोतिबावर आगीने भाविकांची घुसमट
कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या मुख्य दिवसाआधी गुरुवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांंची डोंगराला लागलेल्या आगीने घुसमट झाली. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रचंड धूर पोहोचल्याने भाविकांना प्रचंड त्रास झाला. मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आग दुपारी दोनच्या सुमारास पोहोचली. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी आग त्वरित आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम न घेता स्थानिक यंत्रणेने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले.
मंदिराभोवती असलेल्या खोल डोंगरकपारीत वाळलेले गवत, झाडेझुडपे आहेत. गुरुवारी बाराच्या सुमारास पश्चिमेकडील डोंगराला एका ठिकाणी अतिउत्साही भाविकाने आग लावली. दुपारी तळपते ऊन आणि सोसाट्याचा वारा असल्याने आग फैलावली. दोनच्या सुमारास मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आग येऊन पोहोचली. मंदिराजवळच्या प्रकाश छत्रे यांच्या घराच्या छपराला आग लागली. सर्वत्र पळापळ सुरू झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. पाणी मारून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत राहिले.