जरा पोरीचं त्वॉँड बघू द्या...

By Admin | Updated: May 22, 2016 01:03 IST2016-05-22T01:03:39+5:302016-05-22T01:03:39+5:30

दुर्दैवी मातेने केली आर्त विनवणी

Just let's see the dog's skin ... | जरा पोरीचं त्वॉँड बघू द्या...

जरा पोरीचं त्वॉँड बघू द्या...

आदित्य वेल्हाळ ल्ल कोल्हापूर
पाठोपाठ पोरी झाल्या म्हणून नुकत्याच जन्मलेल्या ‘नकुशी’ला भावाच्या दारात सोडून देताना आईच्या काळजाची घालमेल झाली असली तरी शनिवारी सी. पी आर.च्या नवजात शिशुदक्षता विभागात त्या दुर्दैवी मातेने ‘मला जरासं पोरीचं त्वॉँड तरी बघू द्या की हो...’ म्हणून केलेली आर्त विनवणी मात्र महिला बालकल्याण समितीच्या कार्यकर्त्या व महिला पोलीस यांच्या हृदयाला पीळ पाडून गेली नाही. नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर मातृत्वाच्या वेणा सोसून जन्म दिलेल्या पोटच्या गोळ्याला केवळ लोकलाजेस्तव या मातेने सोडून देण्याचा निर्णय घेतला खरा; पण अखेर आईचे मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते. ‘सीपीआर’मध्ये तिच्या जिवाची ही तगमग तिच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसत होती. एक क्षणभर चिमुकलीला पाहावे असे वाटणाऱ्या त्या मातेच्या डोळ्यांत असंख्य भावनांचे जणू काहूरच उठले होते.
शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून ही माता ‘सीपीआर’च्या नवजात शिशू विभागाच्या दारात भिंतीला पाठ टेकून बसली होती. कुणीतरी तिला सांगितले होते की, तुझे बाळ तुला आता परत देतील. या आशेवर ती बाळाला घेण्यासाठी ठाण मांडून बसली होती. तिच्याभोवती असलेल्या ‘महिला बालकल्याण’च्या चार कार्यकर्त्या आणि दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल यांनी तिला घेरावच घातला होता. ‘तुझं बाळ टाकून देताना तुला काहीच वाटलं नाही का? असली कसली आई तू?’ अशा प्रश्नांबरोबरच तिची माहितीही विचारली जात होती.
या सर्व प्रश्नांच्या माऱ्याला तोंड देताना तिची नजर मात्र आपलं बाळ असलेल्या खोलीच्या दरवाजाकडेच लागलेली होती. कुठल्याही क्षणी डॉक्टर येतील आणि आपल्याला बाळ बघायला बोलावतील अशी असोशी तिच्या डोळ्यांत एकवटली होती. कायद्यानुसार, वैद्यकीय तपासणीनंतरच तीच बाळाची आई आहे की नाही, याची खातरजमा झाल्याशिवाय बाळाला आईच्या ताब्यात देता येत नाही.
तिला पाहायला नवजात शिशू विभागातील बालकांच्या नातेवाईक स्त्रिया जाळीच्या दरवाजात जमा झाल्या होत्या. ‘बाळ टाकून दिलेली आई’ म्हणून तिच्याकडे बघून कुजबुजत होत्या. ही कुजबुज तिच्या कानांवर जात होती; पण त्याकडे दुर्लक्ष करून ती बाळ पाहण्याची आस लावून बसली होती.
‘काय हे ताई, एवढ्या इवल्याशा बाळाला सोडून देताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही?’ असं विचारल्यावर शून्यात बघत ती म्हणाली, ‘बाळाला फक्त पिशवीत ठेवलं नव्हतं हो, दुपट्यात नीट गुंडाळून ठेवलं होतं. एकदा वाटलं, दरवाजावर थाप मारून भावाच्या प्रत्यक्ष हातात बाळाला द्यावं; पण ते धाडस झालं नाही हो...’
एवढं बोलून ती थांबली; पण एका हरलेल्या ‘आई’चे, हसीना सय्यदचे डोळे मात्र बाळाच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते....

Web Title: Just let's see the dog's skin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.