नुसतीच ढगांची गर्दी, पाऊस काही पडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:52+5:302021-07-19T04:16:52+5:30
कोल्हापूर : मुंबई, रायगड, पालघरमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असताना कोल्हापुरात मात्र आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. ...

नुसतीच ढगांची गर्दी, पाऊस काही पडेना
कोल्हापूर : मुंबई, रायगड, पालघरमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असताना कोल्हापुरात मात्र आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. रविवारी ढग भरून येत होते; पण हलकीशी म्हणावी अशीदेखील पावसाची सर येत नव्हती. दिवसभर ऊनसावल्यांचा खेळ सुरू होता. दरम्यान, उद्या, मंगळवार-बुधवारपासून पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पावसाने कोल्हापुरात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच धुमाकूळ घातला आहे. मृग नक्षत्र पावसातच गेले. त्यानंतर आलेल्या आर्द्रा व पुनर्वसू (तरणा पाऊस) ही नक्षत्रे बऱ्यापैकी कोरडी गेली आहेत. किरकोळ सरींचा अपवाद वगळता कडकडीत ऊन अनुभवण्याची वेळ या दोन्ही नक्षत्रांत आली. त्यामुळे जिल्ह्यातील पीकपाण्यावरही संकटाचे ढग अधिक गडद झाले. सलग दोन नक्षत्रे कोरडी गेल्याने आता सर्व भिस्त पुढील तीन नक्षत्रांवर आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी चार वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडेही पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. पाटगाव मध्यम प्रकल्पात ५६ मिलिमीटरचा अपवाद वगळता उर्वरित धरणक्षेत्रात चार ते आठ मिलिमीटर इतका अत्यल्प पाऊस गेल्या २४ तासांत नोंदविला गेला आहे. पाऊसच थांबल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पातळी एका दिवसात आणखी अडीच फुटांनी उतरली असून, ती आता साडेतेवीस फुटांवर आहे.
चौकट
आजपासून म्हातारा पाऊस
आज, सोमवारपासून पुष्यर्क (म्हातारा पाऊस) नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. त्यामुळे पाऊस उधळणार की धुळधाण उडविणार याची आता प्रतीक्षा लागली आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस होईल, असा पारंपरिक अंदाज आहे, तर हवामान खात्याने मंगळवारपासून पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे. बुधवारपासून आठवडाभर पावसाचा जोर राहील, असेही अंदाजात म्हटले आहे.
चौकट
चार बंधारे वाहतुकीसाठी खुले
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे हळूहळू खुले होऊ लागले आहेत. रविवारी दूधगंगेवरील दत्तवाड व कुंभी नदीवरील कळे, शेणवडे, सांगशी हे चार बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले. आता पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ; भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे तर कासारी नदीवरील यवलूजएवढेच बंधारे अजून पाण्याखाली आहेत.