यंत्रमाग कामगारांचीही आंदोलनात उडी
By Admin | Updated: August 19, 2015 00:22 IST2015-08-19T00:22:16+5:302015-08-19T00:22:16+5:30
संपाचा २९ वा दिवस : किमान वेतनाचे ‘क्लेम’चे दावे दाखल करणार

यंत्रमाग कामगारांचीही आंदोलनात उडी
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या पाठोपाठ आता यंत्रमाग कामगार संघटनांनी सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याची घोषणा केली आहे. किमान वेतनातील फरकासाठी क्लेम अॅप्लिकेशनचे दावे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी २९ व्या दिवशीसुद्धा सायझिंग कामगारांचा संप सुरूच राहिला.
शासनाने यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी सुधारित किमान वेतन २९ जानेवारीला घोषित केले. तब्बल २९ वर्षांनी निघालेल्या परिपत्रकाप्रमाणे किमान वेतन मिळावे, अशी मागणी करीत राज्यातील यंत्रमाग केंद्रातील कामगार संघटनांनी विविध आंदोलने केली. मात्र, त्यास शासन प्रतिसाद देत नसल्याने २१ जुलैपासून लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने बेमुदत संप केला. यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळत नसल्याने ८० टक्के कारखाने पडून दररोज होणारी सुमारे शंभर कोटी रुपयांची कापड खरेदी-विक्री ठप्प झाली. आता तर वस्त्रनगरीस आर्थिक टंचाईने ग्रासले आहे.
अशा पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील यंत्रमाग संघटनांच्या कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन सहा महिन्यांचा किमान वेतनातील फरक, तसेच चार तासांचा ओव्हर टाईम पगार मागण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे स्पष्ट केले. सायझिंग कारखाने बंद असल्याने यंत्रमाग कारखानेसुद्धा बंद पडले आहेत. यंत्रमाग कारखान्यांमधील कामगारांना बंदच्या काळातील दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशीही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते दत्तात्रय माने यांनी दिली.
शासनाने जाहीर केलेले सुधारित किमान वेतन दहा हजार ५७३ रुपये असून, कामगारांना महिन्याला तीन ते चार हजार रुपये कमी मिळतात. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांचा असलेला फरक प्रत्येक कामगारासाठी १८ हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे. आठ तासांऐवजी बारा तासाची पाळी कामगारांना असल्याने ओव्हर टाईमचे किमान साठ हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी कामगारांची आहे. अशा प्रकारचे किमान वेतनातील फरकाचे आणि ओव्हर टाईमच्या रकमेची मागणी करणारे दावे सहायक कामगार आयुक्तांकडे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट करून कामगार नेते माने म्हणाले, सध्याच्या वाढत्या महागाईत महिन्याला १५ हजार रुपये किमान वेतन मिळावे. मात्र, किमान वेतनाचा फरक व ओव्हर टाईम मिळण्यासाठी आता कामगारांना संपाचे हत्यार उपसावे लागणार आहे. त्यासाठी २२ आॅगस्टला सकाळी दहा वाजता थोरात चौकातील बाजार शेडमध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, आॅटोलूम कामगार, वहिफणी कामगार यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.
पत्रकार परिषदेसाठी इंटकचे शामराव कुलकर्णी, आयटकचे मारुती आजगेकर, राजेंद्र निकम, कामगार कल्याण संघाचे धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, जॉबर संघटनेचे परशराम आगम, नवक्रांती कामगार संघटनेचे बंडोपंत सातपुते, रघुनाथ तेजम, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अंतरिम वेतनवाढ स्वीकारून सायझिंग सुरू
येथील थोरात चौकामध्ये झालेल्या सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या सभेमध्ये ज्या सायझिंग कारखान्यांच्या मालकांकडून कामगारांना सन्मानाने बोलावून वेतनवाढीची चर्चा केली जाईल. तेथे उच्च न्यायालयातील निकाल लागेपर्यंत अंतरिम वेतनवाढ म्हणून पगार घेतला जाईल आणि संबंधित सायझिंग कारखाने चालू करण्यात येतील, अशी माहिती कामगार नेते ए. बी. पाटील यांनी दिली. यावेळी मारुती जाधव, सुभाष निकम, आनंदराव चव्हाण, आदींची भाषणे झाली.