न्यायसंकुलाचे काम महिन्यात पूर्ण होईल

By Admin | Updated: June 4, 2015 00:45 IST2015-06-04T00:26:30+5:302015-06-04T00:45:20+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती : इमारतीसाठी मुघल साम्राज्य पद्धतीची रचना

The judicial work will be completed in the month | न्यायसंकुलाचे काम महिन्यात पूर्ण होईल

न्यायसंकुलाचे काम महिन्यात पूर्ण होईल

कोल्हापूर : वकिलांसह पक्षकारांच्या सोयीसाठी सर्व न्यायालये एकाच छताखाली यावीत, यासाठी राज्याच्या विधि व न्याय खात्याच्या वतीने कसबा बावडा येथे बांधण्यात येत असलेल्या सहा मजली न्यायसंकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुघल साम्राज्य पद्धतीची रचना असलेल्या न्यायसंकुलाचे काम या महिनाअखेरीस पूर्ण होत आहे.
न्यायसंकुलाच्या इमारतीच्या बांधकामाला सन २००९ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता; परंतु नंतर अंदाजपत्रक वाढत जाऊन तो ५५ कोटी ४९ लाख रुपयांवर गेला. या न्यायसंकुलाचे काम कोल्हापुरातील प्रतिभा कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. सुरुवातीला दीड वर्षात (१८ महिन्यांत) हे काम पूर्ण करण्यात येणार होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव याची मुदत वाढली. ३१ मार्च २०१५ पर्यंत न्यायसंकुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत संपली आहे.
या न्यायसंकुलामध्ये नऊ बाय १३ मीटर, तर सहा बाय नऊ मीटरच्या एकूण ४३ खोल्या आहेत. या न्यायसंकुलामध्ये टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयामधील दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालये स्थलांतरित होणार आहेत. त्याचबरोबर पार्किंगसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
न्यायसंकुलामध्ये केवळ एकच कॅँटीन आहे. सध्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून रंगकाम, पेव्हिंग ब्लॉक व संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, फर्निचर यांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे काम येत्या महिनाअखेरीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. न्यायसंकुलामधील अंतर्गत डिझाईनचे काम पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)


आराखडा
यायसंकुलाची इमारत -
२५३३० स्क्वेअर मीटर क्षेत्र
सुमारे ५५ कोटी ४९ लाख
रुपयांचे काम
जिल्हा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी न्यायालयांचा समावेश
प्रशस्त पार्किंगची सुविधा
सुमारे २१ मोठी न्यायालये,
तर २२ लहान न्यायालयांची स्वतंत्र कार्यालये
खोल्या व हॉल ९ बाय १३ मीटर
व ६ बाय ९ मीटर.

Web Title: The judicial work will be completed in the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.