जोतिबा यात्रा उद्या; तयारी पूर्ण
By Admin | Updated: April 2, 2015 01:25 IST2015-04-02T00:55:14+5:302015-04-02T01:25:27+5:30
स्वागतासाठी ‘दख्खन नगरी’ सज्ज : भाविक दाखल; परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

जोतिबा यात्रा उद्या; तयारी पूर्ण
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर उद्या (दि. ३) एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या स्वागतासाठी दख्खननगरी सज्ज झाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे. प्रशासनाकडून सर्व पातळीवर योग्य ती खबरदारी घेतली आहे. उद्या, शुक्रवारी पहाटे ३ ते ४ वाजता श्री जोतिबा देवाची पाद्यपूजा होईल. ४ ते ५ वाजता काकड आरती होईल. पहाटे ५ ते ६ या वेळेत श्री जोतिबा देवास शासकीय अभिषेक होईल. हा अभिषेक पन्हाळ््याचे तहसीलदार यांच्या हस्ते घालण्याची प्रथा आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत श्री जोतिबा देवाची अलंकारिक राजेशाही थाटातील महापूजा बांधण्यात येईल. सकाळी १० ते १२ या दरम्यान जोतिबा मंदिरात धुपारतीला प्रारंभ होईल. दुपारी २ वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीस सुरुवात होईल. यामध्ये केदारलिंग देवस्थान समितीकडे नोंद असणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या प्रथम निघतील.
श्री जोतीबा मुख्य पालखी सोहळा सायंकाळी ५.३० वाजता तोफेची सलामी होताच मंदिर परिसरातून श्री यमाई मंदिराकडे प्रस्थान होईल. सायं. ७ वाजता श्री यमाई मंदिरात धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर श्री जोतिबाची पालखी परत ८ वाजता जोतिबा मंदिरात येईल. रात्री ९ ते १० यावेळेत पालखी विश्रांतीसाठी सदरेवर थांबेल. रात्री १० वाजता तोफेची सलामी होऊन पालखी सोहळ्याची सांगता होईल.
श्री जोतिबाचे मंदिर २ ते ४ एप्रिलपर्यंत रात्रभर खुले राहणार आहे. ३ एप्रिलला पाचवेळा तोफेची सलामी होईल. यात्रेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे. यामध्ये नऊ पोलीस उपअधीक्षक, १५ पोलीस निरीक्षक, ५६ सहायक व पोलीस उपनिरीक्षक, ८५० पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी पाहणी केली. जोतिबा मंदिर परिसरात रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर, सनराईज यांनी आरोग्य पथक स्थापन केले आहे. सेंट्रल प्लाझामध्ये व्हाईट आर्मीचे आरोग्य तपासणी केंद्र उभे केले आहे.
बैलगाडीतून आलेल्या भाविकांचे बुधवारी जोतिबा डोंगरावर आगमन झाले. आपल्या सहकुटुंबासह बैलगाडीतून येणाऱ्या भाविकांची पारंपरिक पद्धत आजही सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवल्याची माहिती सरपंच डॉ. रिया सांगळे यांनी सांगितले. जोतिबा मंदिर मार्गावरील दुकानदारांनी लावलेले पत्रे व ताडपत्री हटविल्यामुळे सासनकाठी मार्ग प्रशस्त झाला आहे. (वार्ताहर)
पंचगंगा घाटावर आजपासून अन्नछत्राची सोय
कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेनिमित्त आज, गुरुवारपासून पंचगंगा घाटावरून एस. टी. बसेसची सोय केली आहे. येथेच शिवाजी चौक तरुण मंडळाच्या अन्नछत्रास सुरुवात होणार आहे, तर जोतिबा डोंगरावर सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र भाविकांना पोटभर जेवणाच्या तृप्तीचे समाधान देत आहेत.
जोतिबा देवाची यात्रा शुक्रवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून भाविक जोतिबाकडे रवाना होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापुरात पंचगंगा घाटावर माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने जोतिबाला जाणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्राची सोय केली आहे. त्यासाठीची मांडव उभारणी पूर्ण झाली आहे.
येथेच सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊन भाविक एस.टी.तून जोतिबाची वाट धरतात. त्यासाठी याठिकाणी परिवहन महामंडळाच्यावतीने तात्पुरत्या स्वरुपाचे स्टँड उभारले आहे.
जोतिबा डोंगरावरील गायमुख येथे बुधवारपासून सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्रास प्रारंभ झाला.दिवसभरात दहा हजार भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आजपासून अन्नछत्रास सुरुवात होत आहे.
या अन्नछत्राचे उद्घाटन कणेरीमठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या होणार आहे. यावेळी नागपूरचे उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पार्किंग व नो पार्किंगच्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मंदिरात दर्शन रांगा, बॅरिकेटस्ची उभारणी करण्यात आली आहे.