मंत्रालयात आज संयुक्त बैठक

By Admin | Updated: September 1, 2015 00:30 IST2015-09-01T00:30:31+5:302015-09-01T00:30:31+5:30

किमान वेतन प्रश्न : बैठकीतील निर्णयाकडे लक्ष; उच्च न्यायालयाची पुढील तारीख ७ सप्टेंबर रोजी

Joint meeting today in Mantralaya | मंत्रालयात आज संयुक्त बैठक

मंत्रालयात आज संयुक्त बैठक

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाबाबत सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये पुढील तारीख ७ सप्टेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वस्त्रोद्योगासह अन्य छोट्या-मोठ्या उद्योजकांत निराशाजनक वातावरण पसरले होते. दरम्यान, आमदार सुरेश हाळवणकर यांनी दोन्ही घटकांची आज, मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात तीन मंत्र्यांसह प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव अशा अकरा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक लावली आहे. यामध्ये कोणता निर्णय होतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे.मुंबई येथील उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच शासनाच्यावतीने मांडलेले म्हणणेही दाखल करून घेतले. या सर्वांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी तसेच सरकारच्यावतीने अन्य उद्योगांच्या बाबतीतही म्हणणे मांडण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ७ सप्टेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येईल, असे म्हटल्याचे पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयीन कामकाज सुरूच राहील. मात्र, शहरातील उद्योग सुरू व्हावा, यासाठी आमदार हाळवणकर यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजता मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विजय देशमुख, खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी अमित सैनी, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, कामगार आयुक्त, वस्त्रोद्योग संचालक यांच्यासोबत येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष व दोन प्रतिनिधी, तसेच सायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष व दोन प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चर्चा करून उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.


प्रतिनिधींची अनुपस्थिती
आज, मंगळवारी मुंबई येथे होणाऱ्या संयुक्त बैठकीला सायझिंग असोसिएशनला निमंत्रण असले तरी कृती समितीला नाही. तसेच कृती समितीला कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत समोरासमोर चर्चा करायची नाही. त्यामुळे सायझिंगधारकांच्यावतीने आम्ही शासनाकडे सकाळीच आमचे म्हणणे मांडून आम्ही परतणार आहोत, असे बाळ महाराज यांनी सांगितले.


बैठकीस न बोलावल्याने कामगारांकडून निषेध
इचलकरंजी : उद्या (२ सप्टेंबर)ला पुकारलेल्या इचलकरंजी बंदला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असल्यामुळे बंद यशस्वी होईल. एस. टी. बस, रिक्षासह चहाच्या टपरीपर्यंत संपूर्ण बंद पाळला जाणार आहे, अशी माहिती यंत्रमागधारक संयुक्त कृती समितीच्यावतीने आयोजित यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात दत्ता माने यांनी दिली. तसेच आज, मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीस कृती समितीला न बोलविल्याने शासनाचा जाहीर निषेधही करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयात सुधारित किमान वेतनप्रश्नी झालेल्या सुनावणीची माहिती देणे, तसेच यंत्रमाग कामगारांनाही किमान वेतन लागू करावे, यासह अन्य मागण्यांबाबत संघटनेची भूमिका स्पष्टपणे व उद्याचा बंद यशस्वी करणे, यासाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने येथील थोरात चौकात कामगारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी भरमा कांबळे, आनंदा गुरव, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Joint meeting today in Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.