भूमी बचाव अभियानात सामील व्हा : रोडे
By Admin | Updated: June 23, 2015 00:15 IST2015-06-23T00:15:04+5:302015-06-23T00:15:04+5:30
परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन

भूमी बचाव अभियानात सामील व्हा : रोडे
कोल्हापूर : भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वोदय मंडळातर्फे ‘भूमी बचाव अभियान’ राबविण्यात येणार आहे़ त्याबाबत परिवर्तनवादी संघटनांची बैठक ४ व ५ जुलैला वर्धा येथील सेवाग्राममध्ये घेण्यात येणार आहे़ या अभियानात परिवर्तनवादी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वोदयी विचारवंत सोमनाथ रोडे यांनी केले़ राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूरतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफ ताना ते सोमवारी बोलत होते़ ‘सर्वोदय - आजच्या संदर्भात’ हा व्याख्यानाचा विषय होता़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते का़ मा़ आगवणे होते़ रोडे म्हणाले, भूदान चळवळींच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावेंनी २५ हजार मैलांचा पायी प्रवास करून भूदान आणि ग्रामदान चळवळींच्या माध्यमातून सुमारे ४६ लक्ष एकर जमीन मिळविली़ त्यातील हजारो एकर जमिनी भूमिहीनांना देण्यात आल्या़ गोरगरिबांना उत्पन्नाचे साधन मिळावे हा त्यामागचा हेतू होता, पण सध्याच्या सरकारने पूर्वीच्या भूसंपादन कायद्यात बदल करून जाचक अटी घातलेल्या आहेत़ या अटी शेतकऱ्यांना सक्तीने भूमीहीन करणाऱ्या आहेत़
रोडे म्हणाले, महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर आधारित असलेल्या ‘सर्वोदय’ने व्यापक असे जनआधारित आंदोलन कोणत्याही विदेशी देणगी किंवा सरकारी मदतीविना केले आहे़ सर्वोदयात शेवटच्या माणसांच्या सुखाचा विचार केला असून विषमतेला छेद देत माणसा-माणसांत जिव्हाळा निर्माण करण्याचे काम हे आंदोलन करत आलेले आहे़ गोवंश हत्येविरोधात ‘सर्वोदय’ने सातत्याने सत्याग्रह केला आहे़ गोवंश हत्याबंदी विरोधी कायदा होण्यामध्ये ‘सर्वोदय’ची भूमिका महत्त्वाची आहे़ ईशान्य भारतातील अनेक प्रदेशांमध्ये संपत्तीवरून होत असलेल्या वादावर तोडग्यासाठी तेथील बंडखोर युवकांचे प्रबोधन करण्याचे कामही ‘सर्वोदय’ने केले आहे, अशी माहितीही रोडे यांनी दिली़
रोडे म्हणाले, गोडसे प्रवृत्तीचे उदारीकरण, धर्मांध शक्तींकडून एकाधिकारशाहीच्या पुरस्कारामुळे देशात दुसरी आणीबाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या आणीबाणीचा सामना करण्यासाठी ‘सर्वोदय’च्या कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी़ विनाकारण महात्मा गांधींना देशाच्या फाळणीसाठी जबाबदार धरले जात आहे़ धर्मांध शक्तींकडून गांधींना मारण्याचा कट फाळणीपूर्वी १९३४ पासूनच सुरू होता़ हिंदू राष्ट्रनिर्मितीमध्ये धर्मांध शक्तींना गांधीजी हे मोठे अडसर वाटत होते, हे लक्षात घेतले पाहिजे़
अध्यक्षीय भाषणात आगवणे म्हणाले, गांधीजी आणि नेहरू यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी नेहरू गांधींजीच्या विरोधात कधीच वागले नाहीत़ देशाच्या विकासाचे धोरण आखताना नेहरुंनी गांधीजींच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला़ शोषितांच्या कल्याणासाठी पासष्ट वर्षांत काय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे़
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांच्या हस्ते रोडे यांचा सत्कार करण्यात आला़ जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते़ प्रा़ अशोक चौसाळकर यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)