राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांच्या नोकऱ्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:07+5:302021-09-09T04:31:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच राज्यातील तब्बल ...

राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांच्या नोकऱ्या कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच राज्यातील तब्बल ५९७ कंत्राटी आरोग्यसेविकांची पदे रद्द करण्यात आली होती. मात्र राज्यभरातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे अखेर हा निर्णय रद्द् करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत या आरोग्यसेविका सेवेत राहतील याची दक्षता घ्यावी असे पत्रच राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील सर्व शासकीय आरोग्यसंस्थांना बुधवारी पाठवले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सन २०२१/२२ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्याचा ३ हजार २०७ आरोग्यसेविकांच्या पदांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. परंतु या आराखड्यामध्ये ५९७ पदांना मंजुरी आणि वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही पदे रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाला घ्यावा लागला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्यादरम्यान जिवावर उदार होऊन घराघरांमध्ये सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या महिलांना बेरोजगार व्हावे लागणार होते. राज्यभरातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया आल्या. कोरोनाकाळात राबवून घेतल्यानंतर आता आम्हांला वाऱ्यावर सोडता काय अशी विचारणा प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन करून आरोग्यसेविका आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली लोकप्रतिनिधींनीही मंत्र्यांकडे आग्रह धरला. अखेर यातून मार्ग काढून सेवा देण्यास उत्सुक असणारी एकही आरोग्यसेविका सेवेबाहेर राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहा ते १४ वर्षे नोकरी केल्यानंतर एकदमच सेवा समाप्त केल्याने या सर्वांवर आभाळ कोसळले होते.
चौकट
अशी होती जिल्हावार रद्द होणारी पदे
कोल्हापूर ३९, सातारा २९, सांगली २३, सिंधुदुर्ग २१, रत्नागिरी १९, ठाणे ३, रायगड २१, पालघर १, नाशिक १९,धुळे १०, जळगाव १९,अहमदनगर २९, पुणे १६, सोलापूर ३९,औरंगाबाद ८, जालना १०,परभणी ,हिंगोली व अमरावती प्रत्येकी १९,लातूर २२,उस्मानाबाद १६, बीड ३०, नांदेड ३७,अकोला १३, बुलढाणा २४, वाशिम ९, यवतमाळ २१, नागपूर २४, वर्धा २२, भंडारा व चंद्रपूर प्रत्येकी ११.