कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र शिंदे ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:39+5:302021-05-09T04:25:39+5:30
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या संकटात अनेकजण जमेल त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यात खारीचा वाटा म्हणून कोल्हापुरातील रिक्षाचालक ...

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र शिंदे ठरले देवदूत
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या संकटात अनेकजण जमेल त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्यात खारीचा वाटा म्हणून कोल्हापुरातील रिक्षाचालक जितेंद्र शिंदे यांनी गेल्या २५ दिवसांपासून गरोदर महिला, कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. या सेवेतून त्यांनी आतापर्यंत ७० जणांना रात्री-अपरात्री दवाखान्यात नेले आहे.
जितेंद्र हे टाकाळा परिसरातील अनुकामिनी मंदिराजवळ राहतात. आईचे छत्र लहानपणीच हरवले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. इतरांच्या वाट्याला हे जगणं येऊ नये म्हणून ते गरजू गरिबांना रिक्षातून मोफत सेवा देतात. त्यांचा हा उपक्रम गेले अनेक वर्षे सुरू आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपली रिक्षा अशा रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी उपलब्ध केली. जितेंद्र गेल्या २५ दिवसांपासून गरोदर माता, कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही तर तत्काळ तिथे धावून जात रिक्षातून सीपीआर रुग्णालय, अन्य खासगी रुग्णालयात या रुग्णांना वेळेत पोहोचवतात. ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचत नाही अशा ठिकाणी ते रात्री- अपरात्री रिक्षा घेऊन जात गरजूंना मदतीचा हात देत आहेत. या मानवसेवेकरिता त्यांनी एक पैसाही कुणाकडून घेतलेला नाही. पीपीई कीट घालून ते ही सेवा देत आहेत. त्यांच्या या मोफत रिक्षा सेवेला समाजाने सलामच करायला हवा.
कोट
आई लक्ष्मी व वडील दत्तोबा शिंदे यांच्या स्मरणार्थ ही मोफत रिक्षा सेवा मी गरजू व गरीब लोकांकरिता लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून देत आहे. रुग्णांना त्याची मदत होते याचा आनंद मोठा आहे.
- जितेंद्र शिंदे,
रिक्षाचालक कोल्हापूर.
फोटो : ०८०५२०२१-कोल-जितेंद्र शिंदे