जिजाऊंच्या भूमिकेतून आजची पिढी घडवावी

By Admin | Updated: January 13, 2016 01:12 IST2016-01-13T00:46:31+5:302016-01-13T01:12:44+5:30

पद्मा पाटील : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीचा मेळावा

Jijau's role should be made today's generation | जिजाऊंच्या भूमिकेतून आजची पिढी घडवावी

जिजाऊंच्या भूमिकेतून आजची पिढी घडवावी

कोल्हापूर : ‘उत्कृष्ट माता’ म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जगभरात लौकिक आहे. त्यांनी बालशिवरायांवर केलेले संस्कार आणि याबाबतच्या त्यांच्या भूमिकेतून आजची पिढी घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. पद्मा पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यातील व्याख्यानात त्या बोलत होत्या. ‘शिवरायांना घडविण्यात जिजाऊंचे योगदान’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. येथील शाहू स्मारक भवनातील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शांताबाई पाटील होत्या.
प्रा. पाटील म्हणाल्या, जिजाऊ यांनी रामायण, महाभारतातील कथा सांगून बालशिवरायांमध्ये वीरभावना, संस्कार रूजविले शिवाय त्यांना युद्धकला, नीती, जमिन, वतने आदींबाबतचे परिपूर्ण ज्ञान दिले. त्यातून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. जिजाऊ यांच्याबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे. त्यांची भूमिका, त्यांनी शिवरायांवर केलेले संस्कार घेऊन आजची पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने कार्यरत राहावे तसेच मुला-मुलींमध्ये वीरभाव, अन्याय आणि अंधश्रद्धेच्या विरोधातील भावना रूजवावी. ते सद्य:स्थिती आवश्यक ठरणारे आहे. घरा-घरातील मातांनी जिजाऊंची भूमिका, विचारांनी कार्यरत राहण्याची गरज आहे.
यावेळी शाहीर मिलिंद सावंत यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मार्गदर्शन केले. इटलीतील तुरिन विद्यापीठातील वेरोनिका, महासंघाच्या महिला आघाडीच्या दीपा डोणे, बबिता जाधव, मंगल कुराडे, सुनीता पाटील, अनुराधा घोरपडे, अंजली पाटील, अंजली समर्थ, ऊर्मिला समर्थ, धनश्री पाटील, कांचन पाटील, रंजना पाटील, द्रौपदी सावंत, सुगंधा सुतार, कमल पाटील, वैशाली पाटील आदी उपस्थित होत्या. महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलजा भोसले यांनी प्रास्ताविक केले. संगीता राणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

विद्यापीठात जिजाऊ यांचा पुतळा उभारावा...
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला मेळाव्यात विविध मागण्या झाल्या. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आवारात राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुुतळा उभा करावा. दीक्षांत समारंभ होणाऱ्या सभागृहास ‘राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह’ असे नाव द्यावे. विद्यापीठात छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राशी निगडित वस्तुसंग्रहालय उभे करावे, या मागण्यांचा समावेश आहे. उपस्थित महिलांनी हात उंचावून या मागण्यांच्या पाठपुरावा करण्याचा निर्धार केला.

Web Title: Jijau's role should be made today's generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.