जिल्हा परिषदेच्या नोकरीसाठी झुंबड
By Admin | Updated: September 1, 2014 23:49 IST2014-09-01T23:28:32+5:302014-09-01T23:49:33+5:30
अशा आहेत जागा

जिल्हा परिषदेच्या नोकरीसाठी झुंबड
कोल्हापूर : जिल्हा परिषदच्या वर्ग-३ व वर्ग-४ पदांच्या नोकरीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. आजपर्यंत विविध विभागांतील १९४ जागांसाठी सुमारे पाच हजार अर्ज जिल्हा परिषदेकडे दाखल झाले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
जिल्हा परिषदेने वर्ग-३ व वर्ग -४ मधील सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेवक यांसह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती केली जाणार आहे. सर्वाधिक जागा या कंत्राटी ग्रामसेवकांच्या ५३ व परिचरच्या ४३ जागा भरावयाच्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार गेले आठ दिवस प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. काही अर्ज पोस्टाने पाठवले जात आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांच्या ५३ जागांसाठी आज अखेर १६०० अर्ज दाखल झाले असून, परिचरसाठी सुमारे अडीच हजार अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत.
मध्यंतरी दोन दिवस सुटी असल्याने आज अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये एकच गर्दी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सर्व जागांमध्ये महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, अपंग यासाठी राखीव जागा आहेत. या सर्व जागांसाठी २ नोव्हेंबर २०१४ पासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अशा आहेत जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ५
आरोग्य सेवक (महिला)- ३१
शिक्षण विस्तार अधिकारी-२
पर्यवेक्षिका (महिला)-१
वरिष्ठ सहायक (लेखा)- २
औषध निर्माण अधिकारी -२
आरोग्य सेवक (पुरुष)-१३
कनिष्ठ आरेखक -६
कंत्राटी ग्रामसेवक -५३
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- ३०
वरिष्ठ सहायक (लिपिक)- २
परिचर-४३.