पुण्याच्या महिला प्रवाशाची दागिन्यांची पर्स चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:09+5:302021-08-17T04:31:09+5:30
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने एका महिलेची दागिने असलेली पर्स हातोहात लंपास केली. ...

पुण्याच्या महिला प्रवाशाची दागिन्यांची पर्स चोरी
कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने एका महिलेची दागिने असलेली पर्स हातोहात लंपास केली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याबाबत अवंतिका पराग जोग (रा. हडपसर, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जोग या पुणे ते कोल्हापूर एसटीने मध्यवर्ती बसस्थानक येथे आल्या. त्यांनी आपली हॅन्डबॅग खांद्याला अडकवली होती. बसमधून त्या खाली उतरत असताना, अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हॅन्डबॅगमधील दागिने असलेली छोटी पर्स अलगदपणे लंपास केली. त्या छोट्या पर्समध्ये तीन तोळे सोन्याचे मणीमंगळसूत्र, एटीएम कार्ड, असा सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता. बसमधून उतरल्यानंतर हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पुढील तपास पोलीस नाईक युवराज पाटील हे करत आहेत.