नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार
By Admin | Updated: July 15, 2015 01:18 IST2015-07-15T01:13:54+5:302015-07-15T01:18:03+5:30
वारूळजवळ अपघात : दोन जखमी, सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील

नदीपात्रात जीप कोसळून दोन ठार
आंबा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर वारूळ (ता. शाहूवाडी) येथील कडवी नदीच्या पुलावरून सुमारे शंभर फूट खोल पात्रात बोलेरो कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले, तर दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमी व मृत नांदिवडे ( जि. रत्नागिरी) येथील आहेत. जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे. अपघातील एकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त होत आहे.
बिपीन शिरधनकर आणि प्रभाकर हळदणकर हे कुटुंबियांसमवेत बोलेरो गाडीतून कोल्हापूरहुन रत्नागिरीला जात होते. गाडीमध्ये पाचजण होते. वारूळजवळ गाडी आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी नदीपात्रात कोसळली. गाडीतील पाचहीजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने रस्त्यावरील बहुतेकांनी अपघाताची माहिती वारूळ आणि आंबा येथील तरुणांना कळवली. येथील तरुणांनी तत्काळ धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले. रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमीपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी असल्याने अरुणा बिपीन शिरधनकर (वय ४५) या फक्त गावाचेच नाव सांगू शकल्या. अरुणा यांना अपघातामुळे धक्का बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नव्हती. अपघातानंतर तातडीने दिनेश तावरे, शिराज शेख, प्रमोद माळी, प्रशांत मिरजकर, मनोज आडवीळकर, दिनेश कामिरकर आदींनी मदत कार्य केले. दरम्यान, मलकापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यावरुन एका पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि परिचारीकेमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे उपस्थितांतून नाराजी व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)