जयसिंगपूरनजीक माय-लेक ठार

By Admin | Updated: January 18, 2015 00:36 IST2015-01-18T00:35:21+5:302015-01-18T00:36:28+5:30

दोघी कवठेगुलंदच्या : अपघातग्रस्त कंटेनरची जमावाकडून तोडफोड

Jaysingpuran killed My-Lake | जयसिंगपूरनजीक माय-लेक ठार

जयसिंगपूरनजीक माय-लेक ठार

जयसिंगपूर : कंटेनर व बुलेट मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील मायलेकी ठार झाल्याची घटना जयसिंगपूर-कोल्हापूर बायपास मार्गावरील नांदणी नाक्याजवळ आज, शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अनुजा संजय वैरागी (वय २७) व स्वरा संजय वैरागी (५) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड करून डिझेलची टाकी फोडून कंटेनर पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. कंटेनरचालकाला बेदम मारहाण करण्यात आली.
अनुजा वैरागी या मुलगी स्वराला घेऊन संभाजीपूर येथील चुलत बहिणीला मुलगा झाल्याने बाळाला पाहण्यासाठी गेल्या होत्या. बाळाला पाहून नातेवाईक मल्लाप्पा उमरे यांच्या घरी जात होत्या. उमरे यांचा मेहुणा प्रदीप पाटील हे बुलेट (युपीडी ८२७१)वरून या दोघींना घेऊन जात होते. दरम्यान, कोल्हापूरच्या दिशेने सिमेंटची पोती घेऊन कंटेनर (केए २३-क्यू ८१३७) जात होता. याचवेळी नांदणी नाक्याजवळ बुलेट व कंटेनर यांच्यात धडक झाली. काही समजण्याच्या अगोदरच अनुजा व स्वरा रस्त्यावर कोसळून गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाल्या. रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
कंटेनरचालकास चोप
अपघातानंतर कंटेनरचालक शिवय्या मल्लय्या अमरकेड (वय २५, रा. बमनजोगी, ता. सिंदगी, जि. विजापूर) हा पळून जात असतान त्याला पकडून नागरिकांनी बेदम चोप दिला. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नांदणी नाका अपघाताचे केंद्र
शिरोळ-जयसिंगपूर बायपास मार्गावरील नांदणी नाका अपघाताचा केंद्र ठरत आहे. याठिकाणी अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. गेल्या महिन्याभरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघातास निमंत्रण देणाऱ्या या नाक्यावरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच स्पीडब्रेकर ही बसविण्याचा गरज बनली आहे.

Web Title: Jaysingpuran killed My-Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.