जयसिंगपूर, शिरोळला पावसाचा तडाखा
By Admin | Updated: May 13, 2015 00:51 IST2015-05-13T00:18:04+5:302015-05-13T00:51:14+5:30
वृक्ष, खांब कोसळले : विद्युत पुरवठा खंडित; सांगली-कोल्हापूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत

जयसिंगपूर, शिरोळला पावसाचा तडाखा
जयसिंगपूर : जयसिंगपूरसह शिरोळ परिसरास मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे एक तास पडलेल्या पावसामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली, तर सात ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती.
सायंकाळी सहानंतर जोरदार वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. पावसामुळे जयसिंगपुरातील प्रमुख रस्त्यावर वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली. शहरातील बसस्थानकातील आवाराला तळ्याचे स्वरूप आले होते. प्रवासी वर्गाची मोठी तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खडावकर हॉस्पिटलसमोरील तीन विद्युत खांब तसेच उदगाव-शिरोळ बायपास रस्त्यावरील तीन विद्युत खांब कोसळले. तसेच दहाव्या गल्लीत व नांदणी रोड, गोल्ड स्टार चौकात झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडे उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांब पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे जयसिंगपूरसह शिरोळ, उदगावमधील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. उदगाव व चिंचवाड परिसरातील वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरोळ, यड्राव परिसरातही जोरदार पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नाल्याचे स्वरूप आले होते. (प्रतिनिधी)