जयसिंगपूर पालिकेत आरोग्य विभाग धारेवर
By Admin | Updated: November 13, 2014 00:01 IST2014-11-12T23:45:52+5:302014-11-13T00:01:26+5:30
डेंग्यू रुग्ण : राजकीय पक्ष, संघटनांचे आंदोलन

जयसिंगपूर पालिकेत आरोग्य विभाग धारेवर
जयसिंगपूर : शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याच्या घटनेनंतर आज, बुधवारी शिवसेना, भाजप, आरपीआय, दलित सेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. डेंग्यूच्या रुग्णाची जबाबदारी कोण घेणार, प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली.
काल, मंगळवारी शहरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर आज त्याचे पडसाद शहरात उमटले. शिवसेना, भाजप, आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात आले. मुख्याधिकारी हेमंत निकम हे बाहेरगावी असल्याने प्रभारी उपमुख्याधिकारी एम. एस. चाबुकस्वार यांच्याशी कार्यकर्त्यांनी चर्चा करण्यास सुरुवात केली. शहरात शाळकरी विद्यार्थ्याला डेंग्यूची लागण झाली आहे. प्रशासन काय करीत आहे? असा सवाल उपस्थित केला. संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभारी उपमुख्याधिकारी चाबुकस्वार, नगर अभियंता सुभाष कोरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक संदीप कांबळे, आरोग्य विभागप्रमुख व पाणीपुरवठा जलनिस्सारणचे पर्यवेक्षक उमेश राठोड, वरिष्ठ लिपिक अनिल तराळ, आदींवर प्रश्नांचा भडिमार केला. याप्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले.
शिवसेनेचे अॅड. संभाजीराजे नाईक म्हणाले, गेल्यावर्षी नऊ वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नाही. याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. घडलेल्या घटनेची जबाबदारी नगरपालिकेची आहे. डेंग्यूने मृत्यू झाल्यावरच नगरपालिका उपाययोजना करणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
भाजपचे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले, शहरात स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. तात्पुरती कार्यवाही करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना राबवा. सुमारे पाऊणतास झालेल्या खडाजंगीनंतर उपमुख्याधिकारी चाबुकस्वार यांनी कार्यकर्त्यांना कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. स्वच्छता मोहीम राबविली जाईल, या आश्वासनानंतर कार्यकर्त्यांनी दालन सोडले. यावेळी भाजपचे संतोष कुलकर्णी, शिवसेनेचे सूरज भोसले, आरपीआयचे अब्दुल बागवान, संजय निकाळजे, सुनील शिंदे, अरविंद मिरजे, रतन शिकलगार, आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
अन्यथा टाळे ठोकू
शहरात कचरा उठाव केला जात नाही, स्वच्छता केली जात नाही, अशा तक्रारींचा कार्यकर्त्यांनी पाढा वाचला. पालिकेकडून कोणतीच कारवाई न झाल्यास नगरपालिकेला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
घाणीचे साम्राज्य
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मच्छी मार्केटमध्ये येऊन पाहणी केली. नागरीवस्तीमध्ये मटण मार्केटची अस्वच्छता, शौचालय, गटारी, आदी ठिकाणी सुरेश शिंगाडे व सुजित दानोळे यांनी परिसरात असलेली अस्वच्छता दाखविली. यावेळी घाणीचे साम्राज्य पाहून अधिकाऱ्यांनी नाकाला रुमाल लावला.