स्वाभिमानीकडून जयसिंगपूर महावितरणचे अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:57+5:302021-06-18T04:16:57+5:30
जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत पोलमुळे वारंवार अपघात आहेत. हे पोल बाजूला काढून भूमिगत विद्युत पुरवठा ...

स्वाभिमानीकडून जयसिंगपूर महावितरणचे अधिकारी धारेवर
जयसिंगपूर : येथील शाहूनगरमधील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत पोलमुळे वारंवार अपघात आहेत. हे पोल बाजूला काढून भूमिगत विद्युत पुरवठा करावा. यासाठी ९ लाखाचा निधीदेखील मंजूर आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरणला देण्यात आले.
यावेळी उपकार्यकारी अभियंता कडाळे यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी ठेकेदाराला बोलावून शुक्रवारपासून काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
शाहूनगरमध्ये रस्त्याच्या मध्यभागी असलेले पोल काढून भूमिगत विद्युत पुरवठा सुरू करावा, यासाठी स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर भूमिगत विद्युत पुरवठा करण्यासाठी नऊ लाखांचा निधी मंजूर झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ठेकेदाराने या कामाला सुरूवात केली नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना धारेवर धरले. यावेळी ठेकेदाराला बोलावून शाहूनगरमधील रस्त्यावरील पोल काढून भूमिगत विद्युत पुरवठा करण्यासाठी शुक्रवारपासून काम करण्याच्या सूचना अभियंता कडाळे यांनी दिल्या. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर विभागाचे सहायक अभियंता पेटकर यांच्याकडून शहरातील कामे सुरळीतपणे केली जात नाही. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांची भेट घेऊन महावितरणच्या तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी सागर मादनाईक, शंकर नाळे, सचिन मिसाळ, शैलेश आडके, विजय नलवडे यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.