जयसिंगराव शेंडगे शिवसेनेत
By Admin | Updated: August 22, 2014 00:53 IST2014-08-22T00:44:27+5:302014-08-22T00:53:39+5:30
राष्ट्रवादीला रामराम : उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत आज प्रवेश

जयसिंगराव शेंडगे शिवसेनेत
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव शेंडगे यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ केला असून, उद्या (शुक्रवार) पाटण (जि. सातारा) येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधनात अडकणार आहेत. त्यांच्यासमवेत धनगर समाजाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शेंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडले असून, गृहमंत्री आर. आर. पाटील यांना हादरा बसला आहे. येथे आज (गुरुवारी) शेंडगे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.
जयसिंगराव शेंडगे यांनी गेली पंचवीस वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीत काम केले आहे. १९८९ मध्ये काँग्रेसला पक्षातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर २००४ मध्ये बंडखोरी करून मिरज-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांचा त्यावेळी १२ हजार मतांनी पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेंडगे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीस खिंडार पडले आहे. ते गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे गृहमंत्री पाटील यांच्यासाठी हा हादरा मानला जात आहे. शेंडगे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयशी ठरले आहे. हा प्रश्न शिवसेनेच्यावतीने उध्दव ठाकरे यांनी सोडविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहे. (वार्ताहर)