‘जयप्रभा’ राज्य शासनाने विकत घ्यावा
By Admin | Updated: January 14, 2016 00:27 IST2016-01-14T00:27:00+5:302016-01-14T00:27:00+5:30
निवासराव साळोखे : सर्वपक्षीय नागरिक जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीच्या बैठकीत मागणी

‘जयप्रभा’ राज्य शासनाने विकत घ्यावा
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची मातृभूमी व कोल्हापूरची ऐतिहासिक अस्मिता असणारा ‘जयप्रभा स्टुडिओ’ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर घेतले त्याप्रमाणे राज्य शासनाने ‘विशेष बाब’ म्हणून विकत घ्यावा, अशी मागणी जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरिक जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
साळोखे म्हणाले, ज्याप्रमाणे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर राज्य शासनाने विकत घेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचे परदेशातील पहिले स्मारक तयार केले. त्याचप्रमाणे कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओशी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचा संपर्क आला होता असा सांस्कृतिक वारसा असणारा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांंच्याकडून राज्य शासनाने विकत घ्यावा. हा स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत प्रथम सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊ. त्यानंतर पालकमंत्री यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन हा स्टुडिओ शासनाने विकत घ्यावा,
अशी गळ घालू. कारण हा स्टुडिओ हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट झालेला आहे. येथील वारसा हा पुढच्या पिढीला समजण्यासाठी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम अशा दिग्गजांच्या स्मृती जपल्या पाहिजेत.
यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके यांनी हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेऊन चित्रनगरीमध्ये समाविष्ट करावा. त्यातून पुण्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूट कोल्हापुरातही या जागेत करता येईल, अशी सूचना मांडली. अध्यक्षस्थानावरून बोलताना रामभाऊ चव्हाण यांनीही साळोखे यांच्या मागणीस पाठिंबा दिला.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव गावडे, माजी महापौर आर. के. पोवार, अशोक पोवार, पंडितराव सडोलीकर यांनी सूचना मांडल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, भाई बाबूराव कदम, बाबा पार्टे, हेमसुवर्णा मिरजकर, अभिनेते प्रमोद शिंदे, विजय चोपडे, बाळा जाधव, अर्जुन नलवडे, जे. के. पाटील. छाया सांगावकर, हर्षल सुर्वे, किरण चव्हाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)