जयप्रभा, शालिनी सिनेटोन जागेवर बांधकामास परवानगी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:16+5:302021-06-18T04:17:16+5:30

कोल्हापूर : जयप्रभा आणि शालिनी या दोन्ही स्टुडिओतील एक इंचही जागा व्यापारीकरणास देऊ नये, तसेच तेथे चित्रपट निर्मिती उपयुक्ततेशिवाय ...

Jayaprabha, Shalini Cinetone Do not allow construction on the site | जयप्रभा, शालिनी सिनेटोन जागेवर बांधकामास परवानगी देऊ नका

जयप्रभा, शालिनी सिनेटोन जागेवर बांधकामास परवानगी देऊ नका

कोल्हापूर : जयप्रभा आणि शालिनी या दोन्ही स्टुडिओतील एक इंचही जागा व्यापारीकरणास देऊ नये, तसेच तेथे चित्रपट निर्मिती उपयुक्ततेशिवाय कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

राज्य शासनाने शालिनी स्टुडिओची जागा हेरिटेज ग्रेड ३ मध्ये समाविष्ट करण्यास स्पष्ट नकार देत संबंधित व्यावसायिकाच्या रेखांकनास मंजूर देण्याच्या सूचना नगरविकास विभागाने महानगरपालिका प्रशासनास नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने प्रशासक बलकवडे व निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांची भेट घेतली. मागणीचे निवेदन त्यांना दिले. शिष्टमंडळात धनाजी यमकर, राहुल राजशेखर, स्मिता मांडरे, रणजित जाधव, सतीश बिडकर, अर्जुन नलावडे, रवींद्र बोरगांवकर यांचा समावेश होता.

छत्रपती राजाराम महाराज आणि राजभगिनी श्रीमंत आक्कासाहेब महाराज यांनी दोन्ही स्टुडिओ व भोवतालची जागा याचा वापर फक्त चित्रपट निर्मितीकरिताच करायचा आहे, अशी महत्त्वपूर्ण अट घातली असताना या जागांवर व्यापारीकरणास मंजुरी दिली गेली याचीही उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

चित्रपटसृष्टीच्या ऊर्जितावस्थेसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रयत्न करत असताना राज्य शासनाने परस्पर रेखांकनास मंजुरी देऊन महापालिकेच्या अस्तित्वाचाही अपमान केला आहे, यावर निवेदनात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोट ठेवले आहे.

शालिनी सिनेटोनच्या भूखंड क्रमांक ५ व ६ या जागेवर सन २००४ पर्यंत शालिनी स्टुडिओचे अस्तित्व अबाधित होते, पण कायद्याला, नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावून विकासकांनी स्टुडिओचे अस्तित्व जमीनदोस्त केले. याबाबत कोणावरच कारवाई करण्यात आली नाही. त्याचीही चौकशी करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या सभागृहातील ठरावाचा किंचितही विचार न करता राज्य शासन दरबारी रेखांकनास मंजुरी देण्याची सूचना केली जाते ही अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

फोटो क्रमांक - १७०६२०२१-कोल-चित्रपट महामंडळ

ओळ - कोल्हापुरातील जयप्रभा व शालिनी स्टुडिओसंदर्भात अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Jayaprabha, Shalini Cinetone Do not allow construction on the site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.