‘जयंती’चे सांडपाणी पुन्हा थेट पंचगंगेत

By Admin | Updated: May 12, 2015 00:18 IST2015-05-12T00:14:17+5:302015-05-12T00:18:52+5:30

प्रशासन ढीम्मच : कोट्यवधीचे एसटीपी निरुपयोगी

Jayanti's wastewater again punchagangate | ‘जयंती’चे सांडपाणी पुन्हा थेट पंचगंगेत

‘जयंती’चे सांडपाणी पुन्हा थेट पंचगंगेत

कोल्हापूर : शहरातील तब्बल ६५ टक्के सांडपाण्याचे वहन करणाऱ्या जयंती नाल्यावरील पाण्याची उपसा करणारी ७५ कोटी रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा निकामी झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत लाखो लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविनाच पंचगंगेत मिसळत आहे. प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने इचलकरंजीसह नदीकाठच्या गावांना येत्या काही महिन्यांत काविळीसारख्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ७६ एमएलडी (दशलक्ष लिटर) आहे. मात्र, महापालिका प्रशासन या केंद्राकडे पाणी वळविण्यात कमी पडली. परिणामी, एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेच नाही. सध्या केंद्रात जयंती नाल्यातून उपसा केलेल्या ५५ ते ६० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली प्रक्रिया सलग २४ तास बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यातच गेल्या आठवड्यात चारवेळा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे प्रक्रियेविना नदीत पाणी सोडण्याचे आयते कोलीतच महापालिकेला सापडले. प्रत्येक पावसानंतर किमान आठ ते दहा तास जयंती नाला सोडला गेला. आता गेल्या तीन दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत नाल्यातील पाण्याचा उपसा बंद केला आहे.
गेल्या तीन दिवसांत किमान २०० दशलक्ष लिटरहून अधिक दूषित पाणी पंचगंगेत मिसळले आहे. या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्राथमिक प्रक्रिया केलेली नाही. परिणामी शहरातील आजूबाजूच्या नाल्यासह जयंती नाल्यातील मैलामिश्रित सांडपाणी नदीत मिसळल्याने नदीकाठच्या गावांसह इचलकरंजी परिसराला काविळीसह पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jayanti's wastewater again punchagangate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.